'आत्मशाहिरी'द्वारे शाहिर आत्माराम पाटील यांना मानवंदना, श्री शिवाजी मंदिर नाट्यागृहात नामवंत शाहिरांच्या उपस्थितीत रंगणार कार्यक्रम
By संजय घावरे | Published: March 23, 2024 08:32 PM2024-03-23T20:32:36+5:302024-03-23T20:32:54+5:30
Mumbai News: लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
मुंबई - लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 'आत्मशाहीरी' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात नामवंत व ज्येष्ठ शाहीर मंडळी आत्माराम पाटील यांच्या गाजलेल्या रचना सादर करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे २४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता 'आत्मशाहिरी' हा कार्यक्रम सादर होणार आहे. शाहिर आत्माराम पाटील यांच्या देशकार्याला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मानवंदना देण्यासाठी 'आत्मशाहिरी' हे जीवन नाट्य ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव व हास्यसम्राट संतोष पवार सादर करणार आहेत. यात अजिंक्य लिंगायत, दत्ता ठुले, विवेक ताम्हणकर, निलेश जाधव हे शाहीर व त्यांचे सहकारी आत्माराम पाटील यांची गाणी सादर करणार आहेत. याखेरीज शाहीरा इंद्रायणी आत्माराम पाटील व ज्येष्ठ शाहीर मधू मोरे आठवणींसह वयाच्या ८५व्या वर्षी आपल्या पहाडी आवाजात गीते सादर करणार आहेत. शाहीर अंबादास तावरे व साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ हे आत्माराम पाटील यांच्या शाहिरीचे सामाजिक योगदान सांगणार आहेत.
देशाचा प्रदीर्घ काळ चाललेला स्वातंत्र्य लढा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात शाहीर मंडळींनी केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर लोकहितासासेबतच लोकजागृतीचे कार्यक्रमही शाहिरांनी केले आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक झुंजार बाण्याचे दर्शन घडविणारे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती, मराठवाडा मुक्ती हे लढेही शाहिरांनी आपल्या लेखणी, वाणी आणि कृतीने गाजवले आहेत. यामध्ये शाहीर आत्माराम पाटील यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. ९ नोव्हेंबर १९२३ रोजी जन्मलेल्या शाहिर आत्माराम पाटील यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. १९४२ ते २००२ हा ६० वर्षांचा प्रदीर्घ काळ आत्माराम पाटील यांनी शाहिरीच्या माध्यमातून गाजवला आहे. आदिवासी जीवनाचा पाच हजार वर्षांचा इतिहास, जाती व्यवस्थेचा पसारा, शिवकालाचे स्वराज्य दर्शन, स्वातंत्र्य लढ्याबरोबरच महाराष्ट्र व मराठी भाषेचा इतिहास, चीन व पाकिस्तानच्या युध्दखोरीचा पंचनामा, रोजच्या घडामोडीचा वेध घेणारे वर्तमानही त्यांनी आपल्या शाहिरीद्वारे जनमानसांपर्यंत पोहोचले आहे.