संताप व्यक्त करत मुंबईकरांकडून श्रद्धांजली; पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 03:07 AM2019-02-16T03:07:43+5:302019-02-16T03:07:54+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला.
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरोधात शुक्रवारी मुंबईत ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला.
दक्षिण मुंबईत मोहम्मद अली मार्गावरील भेंडीबाजार बंद ठेवत स्थानिकांनी निषेध नोंदवला. तसेच राग व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. रजा अकादमी आणि उल्मा ए अहलेसुन्नत यांनी स्थानिक मुस्लीम बांधवांना आवाहन करत तीन ठिकाणी श्रद्धांजली सभा घेतल्या. त्यात सकाळी साडेअकरा वाजता भेंडीबाजार येथील इमाम अहमद रझा चौक, दुपारी पावणेदोन वाजता सैफी जुबिली स्ट्रीट येथील हंडीवाला मशिदीजवळ व दुपारी पावणेतीन वाजता छोटा सोनापूर येथील सुन्नी बिलाल मशीद येथे दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मुस्लीम बांधवांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
बोरीवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरील ओंकारेश्वर मंदिर चौक परिसरात शिवसैनिकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंटजवळ शिवसैनिकांनी निदर्शने करत रोष व्यक्त केला. गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडेही सकाळी शिवसैनिकांनी निदर्शने करत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून शिवसैनिकांनी निषेध मोर्चा काढत पाकविरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील पारसी पंचायत भुयारी मार्ग भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
दक्षिण मुंबईतील छोटा सोनापूर येथील सुन्नी मशीद ए बिलाल येथे पाकचा झेंडा जाळत मुस्लीम बांधवांनी संताप व्यक्त केला. याशिवाय शहिदांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला.
गोरेगावमधील नागरी निवारा येथील सारस्वत सर्कलनजीकच्या जिजाऊ कट्ट्यावर स्थानिकांनी मोठ्या संख्येने जमत शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
मुंबई शहर व उपनगरातील मशिदींमध्ये मुस्लीम संस्था, संघटना व युवक-युवतींच्या वतीने शुक्रवारच्या नमाज पठणानंतर हुतात्म्यांसाठी सामूहिक प्रार्थना केली.