शिवशंकर भाऊंच्या निधनानंतर केंद्रीयमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली, जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:43 PM2021-08-04T23:43:09+5:302021-08-04T23:45:12+5:30
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई - संत नगरीची वैभवशाली ओळख केवळ देशालाच नव्हे तर जगाला करून देणारे व्यक्तिमत्त्व, अध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ, ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून माणुसकी धर्म निभावण्यासाठी आयुष्य वेचणारे श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शोककळा पसरली आहे.
शिवशिंकर भाऊ पाटील यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाऊंना श्रद्धांजली वाहिली आहे.
नितीन गडकरींकडून भावना व्यक्त
श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. भाऊ हे एक व्रतस्थ आणि कर्मयोगी होते, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली श्रद्धांजली त्यांना अर्पण केली. श्री गजानन महाराज संस्थानचे पावित्र्य राखण्या बरोबरच संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक आणि धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ कायम स्मरणात राहतील, अशा भावना व्यक्त करीत ना गडकरी यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
शरद पवारांकडून श्रद्धांजली
सात्विकता, समर्पण आणि सेवाभावाने सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे जपणारे निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी गरजू, विद्यार्थी, आदिवासी समाजासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. श्री गजानन महाराज संस्थानाच्या जडणघडणीत देखील शिवशंकरभाऊंच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे व नियोजनाचे मोठे योगदान आहे. स्वच्छतेला धार्मिक अधिष्ठान देत आनंदसागर सारखं नंदनवन त्यांनी उभं केलं. आध्यात्मिकतेला समाजसेवेची जोड देत शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर चालवलेला सेवायज्ञ अनेकांसाठी आदर्शवत आहे. शिवशंकरभाऊंच्या स्पृहणीय व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण आदरांजली!
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शोक व्यक्त
शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानं मानवसेवेला वाहून घेतलेले सेवेकरी निर्माण करणारं चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं आहे. एक व्रतस्थ सेवेकरी, निष्काम कर्मयोगी, अध्यात्माच्या माध्यमातून मानवसेवेचा डोंगर उभा करणारं महान व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. शेगाव संस्थानचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शिवशंकर भाऊंचं व्यवस्थापनकौशल्य जगात सर्वोत्कृष्ट होतं. शेगाव संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभारलेली यंत्रणा, केलेलं काम जगभरातल्या युवकांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मयोगी शिवशंकर भाऊंच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाहिली श्रद्धांजली
श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या देहावसानाची वार्ता ऐकून या ओळी मनात आल्या. पराकोटीची निस्पृहता आणि मनामध्ये कणव बाळगून श्री. शिवशंकर भाऊंनी प्रपंचाची वाटचाल परमार्थाच्या आधारावर करून दाखविली. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात कमल पत्रावरील जल बिंदू प्रमाणे निर्लिप्त वृत्तीने अखंड सेवेचे व्रत चालविले. श्री. गुरुजी जन्मशती समितीचे सदस्य असतांना त्यांच्या संत सदृश जीवनाचे दर्शन मला जवळून घेता आले हे मी माझे व्यक्तिगत सौभाग्य मानतो. एकादशीच्या पवित्र दिवशी त्यांनी सुरु केलेल्या पुढच्या प्रवासात शांती व प्रकाशाचा अधिकार त्यांनी मिळवलेलाच आहे. त्यांच्या सारखेच निरलस वृत्तीने भक्ती व सेवेचे व्रत अखंड सुरु ठेवण्याचे दायित्व आपणा सर्वांवर आले आहे. ते उत्तम रीतीने पार पाडण्याचे धैर्य व शक्ती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना श्री परमेश्वर चरणी करीत मी श्री शिवशंकर भाऊंच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो.