Join us

‘संविधान बचाव’ला तिरंगा एकता यात्रेने प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:35 AM

काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपा तिरंगा एकता यात्रा काढणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी विरोधक आणि सत्तारुढ भाजपा आमनेसामने असतील.

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष २६ जानेवारीला राज्यभर संविधान बचाव रॅली काढणार असून, त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपा तिरंगा एकता यात्रा काढणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी विरोधक आणि सत्तारुढ भाजपा आमनेसामने असतील.मुंबईतील संविधान बचाव रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जदयूचे शरद यादव, तुषार गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारूक अब्दुला, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आदी सहभागी होतील, अशी माहिती खा. राजू शेट्टी यांनी दिली. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे आॅफ इंडिया अशी सर्वपक्षीय रॅली निघेल. घटनेने दिलेल्या व्यक्तिगत, सामाजिक स्वातंत्र्यावर भाजपा सरकारच्या काळात गदा आली असून, घटना बदलण्याचे सरकारचे मनसुबे आहेत. ते जनतेसमोर आणण्यासाठी रॅली असेल, असे खा. शेट्टी म्हणाले. या रॅलीला मुंबई काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पक्षाचे कार्यकर्ते त्यात सहभागी होतील, असे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.दरम्यान मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होतील. चैत्यभूमीपासून यात्रा सुरू होईल. भाजपाचे खासदार, आमदार, मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यात सहभागी होतील, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.राज्यात सुमारे ३ हजार ठिकाणी ध्वजवंदन -भाजपाच्या वतीने राज्यभर तिरंगा एकता यात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राज्यभरात तीनशे ठिकाणी या यात्रा काढण्यात येतील. भाजपाच्या वतीने राज्यात सुमारे ३ हजार ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येईल व घटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले जाईल. समाजात दुफळी माजविण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून होत असतानाच, तिरंग्याखाली सर्वांना एकत्र आणून, सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश तिरंगा यात्रेद्वारे दिला जाईल, असे दानवे यांनी सांगितले.