Join us

Tricolor: 'हर घर तिरंगा' हे भारतीय ध्वजाचे व्यावसायिकरण, अमोल मिटकरींचं टिकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 11:44 AM

Tricolor: केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहिम सध्या जोमाने सुरु असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे

मुंबई - देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्यासाठी, तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये मोदी सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आतापर्यंत जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. मात्र, आता प्रत्येकजण आपल्या घरात रात्रंदिवस तिरंगा फडकवू शकतो. मोदी सरकारच्या या मोहिमेची जय्यत तयारी सुरू असून कोट्यवधी देशभरात ध्वज बनविण्यात येत आहेत.  

केंद्र सरकारकडून हर घर तिरंगा ही मोहिम सध्या जोमाने सुरु असून शासनाकडून विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 30 रुपये आहे. तर, खासगी संस्थेकडुन विक्रीस असलेल्या तिरंग्याची किंमत 25 रुपये आहे. मात्र, या तिरंग्याच्या क्वॉलिटीमध्येही फरक असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजप सरकारच्या राज्यात एकीकडे देश आर्थिक संकटात सापडला आहे. तर, शिंदे सरकारच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र विविध समस्यांनी होरपळून निघाला असून याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकार 'हर घर तिरंगा मोहिम' राबवत असून केंद्र सरकार भारताच्या ध्वजाचे व्यावसायिकरण करीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

पुणे महापालिकेकडून ५ लाख ध्वजांचे मोफत वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महापालिकेकडून १५ क्षेत्रीय कार्यालयात सुमारे ३०० केंद्रांवरून ५ लाख झेंडे मोफत वाटले जाणार आहेत. हा उपक्रम दिनांक १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोदींकडून तिरंगा फडकविण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून प्रत्येक घरात तिरंगा उत्सवात जनतेला सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'यावर्षी जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा प्रत्येक घरात तिरंगा चळवळ मजबूत करूया. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकवावा किंवा आपल्या घरांमध्ये लावावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे मोदींनी म्हटले आहे. 

टॅग्स :अमोल मिटकरीनरेंद्र मोदीपुणे