मुंबई- राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी भोंग्याचे वाटप करून तणाव निर्माण करायचा व नवहिंदू ओवेसी विरुद्ध खरा हिंदू यांच्यात दंगली घडवून महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा कट शिजत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला.
आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं. पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
सध्या जे पोथी ठेवून हनुमान चालीसा वाचत आहेत, त्यांना हनुमान चालीसाविषयी एवढीच धार्मिकता आहे, तर चालीसा त्यांच्या तोंडपाठ असायला हवी होती, असा टोला लगावून राष्ट्रगीत, वंदे मातरम ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी आता हनुमान चालीसाविषयी ढोंग सुरू केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाने भोंग्याचे राजकारण संपुष्टात आणल्याचे सांगून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोंगे वाटप व हनुमान चालीसा वाचनाचे घाणेरडे राजकारण केले, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.