कल्याण : येथील महात्मा फुले चौक पोलिसांनी गांजाचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्या तिघांना रविवारी अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तिच्यासह अन्य एका आरोपीला जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.
एक तरुण गांजा घेऊन कल्याणमध्ये विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने शिवाजी चौक परिसरात सापळा लावून गांजा घेऊन आलेल्या संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. रोशन पांडुरंग पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. अंगझडतीत त्याच्याकडून २६ हजार ८८० रुपयांचा १.७९२ किलो गांजासह पाच हजाराचा मोबाइल आणि कापडी पिशवी आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी ही कारवाई ७ डिसेंबरला केली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गांजा जळगावमध्ये राहणाऱ्या उषाबाई रमेश पाटील आणि अशोक इबू कंजर यांच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी जळगावला रवाना झाले. तेथून अशोक आणि उषाबाई यांना रविवारी पाेलिसांनी ताब्यात घेतले.
याआधीही केली होती एका आरोपीला अटक
उषाबाई पाटील हिचा पती रमेश हा गांजा तस्करीच्या व्यवसायात होता. त्याच्या मृत्यूनंतर उषा हिने हा धंदा चालू ठेवला. या प्रकरणातील अन्य आरोपी अशोक कंजर हा मोठा गांजा तस्कर आहे. त्याच्या अंमळनेर येथील घरातून फेब्रुवारी, २०१८ मध्ये ११६ किलो ग्रॅम वजनाचा गांजाचा माल आणि ५० लीटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली होती. त्याला अंमळनेर पोलिसांनी या प्रकरणी अटकही केली होती, अशी माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी जाधव यांनी दिली.