डोंगरउतारावरील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी; पालिकेकडून उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:13 AM2024-05-17T10:13:08+5:302024-05-17T10:21:00+5:30
पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व तयारी म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी हाती घेतली आहे.
मुंबई : पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळापूर्व तयारी म्हणून धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी हाती घेतली आहे. मुंबईतील डोंगरउतारावरील धोकादायक झाडांची छाटणीही या कामाअंतर्गत करण्यात येत आहे. त्यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षणाच्या जवळपास ४० ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणांवरील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी केली असून उर्वरित झाडांची छाटणी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून मुंबईतील धोकादायक झाडांची, तसेच रेल्वे मार्गांलगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्यात येत आहे.
डोंगर उतारावरील झाडांची छाटणी करण्याच्या सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार डोंगर उतारावर, टेकड्यांवर धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या छाटणीचे काम वेगात सुरू आहे. १३ मेपर्यंत ४१४ झाडांपैकी ३०५ झाडांची छाटणी केली आहे. उर्वरित झाडांची छाटणी देखील ७ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
खासगी, शासकीय मालकीच्या जागेतील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी आठ हजार ५५७ आस्थापनांना नोटीस बजावल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी
यांनी सांगितले.