मंगेश कराळे -नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावर ऑटोरिक्षा व मोटारसायकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून व हातातून मोबाईल खेचणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोबाईल खिशात ठेवून प्रवास करणाऱ्या व मोबाईलवर बोलत चालणाऱ्यांकडील मोबाईल चोरटे जबरीने खेचुन चोरी करण्याच्या घटनेत वाढ झाली होती. या मोबाईल चोरांच्या आतंकमूळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने व दाखल गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. गुन्हे शाखेने दोन वेगवेगळी पथके तयार करुन जबरी चोरी झालेल्या गुन्हयांच्या घटनास्थळांना भेटी देवून तांत्रिक पुरावे हस्तगत करुन व गुप्त बातमीदाराकरवी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ऊझेर अन्सारी (२१), सलमान अन्सारी आणि उसैर अन्सारी (२२) तिघांना ताब्यात घेवून त्यांचेकडे केलेल्या चौकशीत वालीव पोलीस ठाणे आणि पेल्हार पोलीस ठाणेस दाखल जबरी चोरीच्या खालील १३ गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून गुन्हयातील विविध कंपन्यांचे मोबाईल व गुन्हयात वापरण्यात आलेली मोटार सायकल असा एकूण २ लाख ८ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नशापान आणि अय्याशी करण्यासाठी हे आरोपी मोबाईल खेचुन पळून जायचे. चोरीचे मोबाईल विकून आलेल्या पैश्यांवर मजा करायचे. १३ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. - शाहूराज रणावरे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट दोन)