Join us

जकार्तामध्ये अडकलेल्या क्षितिजचा परतीचा प्रवास सुरू!

By admin | Published: January 05, 2016 2:53 AM

इंडोनेशियामध्ये अडकून पडलेला वर्सोव्यातील मराठमोळा तरुण क्षितिज घाणेकर याचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

मुंबई : इंडोनेशियामध्ये अडकून पडलेला वर्सोव्यातील मराठमोळा तरुण क्षितिज घाणेकर याचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर टिष्ट्वट केल्यामुळे त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, तो येत्या दोन दिवसांत मुंबईत परतणार असणार आहे. एका एंजटने पाठविलेल्या खोट्या ई-मेलला बळी पडून, तो नोकरीच्या शोधात इंडोनेशियामध्ये पोहोचला होता. जवळचे पैसे संपल्यानंतर, काही दिवस तो तिथे निर्वासितासारखा भटकत आहे.वर्सोवा परिसरातील घाणेकर निवासमध्ये कुटुंबासह राहणाऱ्या क्षितिज याला मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्याची इच्छा होती. नोकरीबाबत सोशल नेटवर्किंग साईट्सवर माहिती शोधताना फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख मुकेश मुंडा या ठगाशी झाली. इंडोनेशिया येथे मर्चंट नेवीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंडा याने त्याला ६५ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यासाठी सांगितले. क्षितिजला खात्री पटावी, यासाठी इंडोनेशियातील एका शिपिंग कंपनीच्या नावाचा नियुक्तीपत्र असलेला खोटा ई-मेलसुद्धा मुंडा याने पाठविला होता. मुंडाच्या आमिषाला बळी पडलेल्या क्षितिजने त्याच्या खात्यामध्ये पैसे भरून जकार्ता गाठले.जकार्तामध्ये पोहोचल्यानंतर क्षितिजने तेथे नोकरीबाबत विचारणा केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मुंडा यानेसुद्धा त्याचा मोबाइल बंद केला. क्षितिजने सोबत नेलेले पैसेही संपले होते. पुन्हा भारतात परतण्याचे मार्ग बंद झाल्याने क्षितिजने मुंबई पोलिसांनी नुकत्याच सुरू केलेल्या ट्विटर अकाउंटवर १ जानेवारीला ट्विट केले. ‘फसवणूक झाली असून मला मदत करा,’ असे आवाहन केले. क्षितिजने केलेल्या ट्विटची दखल घेत, पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तत्परतेने त्याबाबत कार्यवाही केली. क्षितिजने आॅनलाइन दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी आरोपी मुंडा विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता, तसेच पोलीस उपायुक्त कुलकर्णी यांनी इंडोनेशियातील भारतीय दुतावासाशी संपर्क साधून क्षितिजला मदत करण्याचे आवाहन केले होते. क्षितिजच्या वडिलांनी पैसे गोळा करून त्याच्या बँक खात्यात जमा केले. याच पैशांच्या आधारे क्षितिजने परतीचे विमान तिकीट काढले. तो मायदेशी येण्यास निघाला आहे. (प्रतिनिधी)