मुंबईकर-पर्यटकांची पालिका मुख्यालयात सफर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 02:33 AM2021-01-31T02:33:52+5:302021-01-31T02:34:10+5:30
Mumbai News : मुंबई महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू शनिवारपासून मुंबईकर-पर्यटकांसाठी ‘हेरिटेज वॉक’साठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी १५ पर्यटकांनी हजेरी लावत या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेतले.
मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयाची पुरातन वास्तू शनिवारपासून मुंबईकर-पर्यटकांसाठी ‘हेरिटेज वॉक’साठी खुली करण्यात आली. पहिल्याच दिवशी १५ पर्यटकांनी हजेरी लावत या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेतले. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः उपस्थित महापौर किशोरी पेडणेकर यांनी अर्चना नेवरेकर व सीताराम शेट्टी या पहिल्या पर्यटकांना सोन्याचा मुलामा दिलेले पालिकेचे बोधचिन्ह, पुष्पगुच्छ व ऐतिहासिक माहिती असलेली दिनदर्शिका भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळच असणाऱ्या या देखण्या वास्तू पाहण्याचा मोह मुंबईकर-पर्यटकांना नेहमीच होतो. या वास्तूचे पर्यटन घडावे, यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार पर्यटकांचा पहिला समूह शनिवारी पालिका मुख्यालयात आला होता.
ऑनलाइन बुकिंग शक्य
या हेरिटेज वॉकसाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. गेट क्रमांक दोनपासून ते गेट क्रमांक सातपर्यंत या इमारतीचे अंतरंग सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हा ‘हेरिटेज वॉक’ मिळणार आहे.
दोन आठवड्यांचे बुकिंग फुल
पालिका मुख्यालयातील ‘हेरिटेज वॉक’साठी दोन आठवड्यांचे बुकिंग फुल झाले आहे; मात्र या सफरसाठी प्रतिव्यक्ती तीनशे, तर मुलांसाठी दीडशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
असे आहे मुख्यालय
अत्यंत कमी खर्चात ही इमारत बांधण्यात आली आहे. इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन सिंहांना पंख असलेले प्रतीक नजरेस पडते.
या ठिकाणी असलेली तिजोरी ही पहिल्या माळ्यापर्यंत विस्तृत स्वरूपात पसरली आहे. इमारतीच्या डोममधील वरच्या भागात
पांडवकालीन मंदिराप्रमाणे ‘की’ आहे, तर आतील बाजूस सोन्याचा मुलामा दिला आहे.
गॉथिक शैलीत असणारी पालिकेची ही इमारत चार मजल्यांची असून दगडी बांधकाम आहे. या इमारतीबरोबरच पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे. मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत.