तिहेरी तलाक : जामिनावर पतीची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:48 AM2018-12-05T05:48:28+5:302018-12-05T05:48:33+5:30
तिहेरी तलाक देणाऱ्या पतीची उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामिनावर सुटका केली.
मुंबई : तिहेरी तलाक देणाऱ्या पतीची उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामिनावर सुटका केली. या टप्प्यावर न्यायालय याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने आरोपी पतीला दिलासा दिला.
वसईचा रहिवासी इन्तेखाब आलम मुन्शी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यास वसई सत्र न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे मुन्शी याने उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.
मुन्शी याने पत्नीला दिलेला तलाक तिहेरी तलाक पद्धतीनेच दिला, हे ठरविण्याची ही वेळ नाही. हे प्रकरण कौटुंबिक वादाचे असून, मुन्शीच्या ताब्याची पोलिसांना आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने मुन्शीचा अटकपूर्व जामीन काही अटींवर मंजूर केला. तसेच मुन्शी याला दर शनिवारी तपास अधिकाºयांपुढे उपस्थिती लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.