मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन मंत्र्यांची ओळख विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करुन दिली. यानंतर राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधान भवनात आगमन झाले, त्यांनी सर्वप्रथम विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या भेटीची चर्चा रंगली आहे.
अजित पवारांनी ट्विट देखील केलं आहे. विधानसभेत सर्व समाज घटकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर ठोस तोडगा निघेल, लोकहिताचे निर्णय घेतले जातील यासाठी ट्रिपल इंजिनचं हे सरकार सक्षम आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सत्तेत सामील झालो आहोत त्यामुळे मी आणि सगळे सहकारी लोकसेवेसाठी कटिबद्ध आहोत. तुमच्या विश्वास आणि आशीर्वादानं आपण सर्वजण मिळून महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास पोहोचवू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यावर विरोधकांनी आत्मविश्वास गमावला असून आपल्या कामातून आपण त्यांना उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला. तर राज्यात लोकशाहीच शिल्लक राहिली नसल्याची टीका विरोधकांनी केली.