मुंबई : चेंबूरमधील अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी असलेला भूखंड शासनाने मेट्रोच्या कामासाठी आणि एचपीसीएल कंपनीला दिला आहे. त्यामुळे या परिसरात वाहनतळासाठी एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. परिणामी, सर्व वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. शासनाने हे राखीव भूखंड पुन्हा ताब्यात घेऊन या ठिकाणी वाहनतळ उभे करावे, अशी मागणी रहिवाशांची आहे. ही मागणी लवकर पूर्ण न झाल्यास याबाबत आझाद मैदान येथे आंदोलन छेडण्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे.
चेंबूर येथील वाशीनाका, माहुल गाव, गव्हाण गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरात अनेक तेल आणि गॅस कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील मालाची ने-आण करण्यासाठी दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे ही वाहने याच परिसरातील रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूककोंडी होते. या अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी या परिसरात भू.क्र. २३० आणि २८२ या ठिकाणी राखीव जागा ठेवण्यात आली होती. मात्र भू. क्र. २३० मधील ४० एकर जागा ही सध्या मेट्रो ३च्या यार्डासाठी देण्यात आली आहे. तर भू. क्र. २८२ या जागेवर सध्या एचपीएसीएल कंपनीच्या नवीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. भू. क्र. २३० मधील ही जागा सन १९९१ आणि २०३४च्या विकास आराखड्यात वाहनतळ म्हणून आरक्षित आहे. असे असताना शासनाने ही जागा मेट्रो ३ च्या कामाकरिता दिल्याने भविष्यात या ठिकाणी वाहनतळ होणार की नाही, असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.
आमचा मेट्रो अथवा तेल कंपन्यांना विरोध नाही. मात्र शासनाने वाहनतळासाठी राखीव असलेल्या जागेवर वाहनतळच उभे करावे, अशी मागणी येथील रहिवाशांचीआहे. यासाठी येथील स्थानिक नगरसेविका निधी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसह, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस आणि येथील कंपन्यांना पत्रव्यवहार करून ही जागा पुन्हा वाहनतळासाठी देण्याची मागणी केली आहे.
‘योग्य कारवाई करावी’या परिसरात विविध कंपन्यांकडून दुतर्फा पार्किंग करण्यात येते. पार्किंगवर नियंत्रण नसल्यामुळे वाहतूककोंडी होते. तसेच अपघात घडतात. याचा फटका नागरिकांना बसत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही. यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- प्रमोद शिंदे, निमंत्रक, वाहतूककोंडी निवारण कृती समिती