मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तिहेरी तलाक बंदीसाठी आणलेला कायदा इस्लामविरोधी आहे. सर्व आघाड्यांवर अपयश आल्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून तिहेरी तलाकचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी केली. नागपाडा जंक्शन येथे एमआयएमकडून आयोजित जलशात ते बोलत होते.मुस्लिमांसाठी शरियत सर्वोच्च आहे. तिहेरी तलाकच्या नावाखाली शरियतमध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. मुस्लिमांचा कैवार घेणाºया काँग्रेस, समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनीही तिहेरी तलाकबाबत संसदेत भूमिका घेण्याचे टाळले. या पक्षातील नेते खासगीत मोदींना रोखण्याची भाषा करतात, प्रत्यक्षात तिहेरी तलाकसारख्या विषयांवर बोलायची वेळ येते तेव्हा मौन धारण करतात, असा आरोपही ओवेसी यांनी केला. मात्र, एमआयएम शरियतमधील ही ढवळाढवळ सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत मांडले जात असताना काँग्रेससह सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते गप्प होते. केवळ एमआयएमनेचया मुद्द्यावर मुस्लिमांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. या वेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलिल यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.ओवेसी यांच्या सभेदरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, असे या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी सांगितले.
तिहेरी तलाक बंदी शरियतवरील हल्ला, जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा डाव - ओवेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 3:56 AM