मुंबई : अवघ्या १०० रुपयांच्या वादातून भांडुपमधील तिहेरी हत्याकांड घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे घटनेच्या ४ दिवसांपूर्वीच याची चाहूल भांडुप पोलिसांना लागली होती. मात्र, किरकोळ भांडण म्हणून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावर वेळीच कारवाई केली असती, तर हे तिहेरी हत्याकांड रोखता आले असते, अशी माहिती स्थानिक फेरीवाल्यांकडून देण्यात येत आहे.भांडुप झकेरीया कंम्पाऊंड परिसरात १०० हून अधिक फेरीवाले बसतात. याच परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय करणारा शहबाज गुलामअली खान (२५) त्यांच्याकडून ५० ते १०० रुपयांचा हफ्ता घेत असे. जे पैसे देण्यास नकार देत त्यांना तो बेदम मारहाण करत असे. रविवारी साडे चारच्या सुमारास शहबाजने पैसे देण्यास नकार देणाऱ्या फेरीवाल्याच्या जागी गाडी पार्क केली. तरीही पैसे देण्यास फेरीवाल्यांचा नकार कायम होता. याच वादात फेरीवाल्यांसोबत त्याची बाचाबाची झाली. शहबाजच्या अत्याचाराला कंटाळलेल्या ४ फेरीवाल्यांनी त्याला मारहाण सुरु केली. हातातील चाकूने त्याच्यावर वार केले. त्याच्या मदतीसाठी धावलेल्या शाबाद गुलामअली खान (१५), गुलामअली अब्दुल हलीम खान (४८) यांच्यावरही चाकूने हल्ला केला.नागरीक जमताहेत पाहून चौघांनी पळ काढला. उपचारादरम्यान तिघांचाही मत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे. चौघेही फेरेवाले उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. याप्रकरणी काही संशयितांकडे पोलीस चौकशी केली आहे....तर गुन्हा रोखता आला असताघटनेच्या चार दिवसांपूर्वी १०० रुपयांच्या हफ्त्यांवरुन शहबाजचा फेरीवाल्यांसोबत वाद झाला होता. याच वादात त्याने फेरीवाल्यांना पट्ट्याने मारहाण केली होती. फेरीवाल्यांच्या तक्रारीवरुन भांडुप पोलीस तेथे धडकले. मात्र, या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले नाही. घटनेच्या दिवशी त्याच फेरीवाल्यांच्या जागेवर शहबाजने गाडी पार्क केली होती. पोलिसांनी वेळीच याप्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले असते, तर हे हत्याकांड घडले नसते, अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
१०० रुपयांच्या वादातून घडले तिहेरी हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 2:38 AM