क्षुल्लक वादातून वाढताहेत जीवघेणे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:32+5:302021-07-08T04:06:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत क्षुल्लक वादातून होणाऱ्या हत्यांबरोबरच हत्येचा प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत क्षुल्लक वादातून होणाऱ्या हत्यांबरोबरच हत्येचा प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून समोर येत आहे. मुंबईत दिवसाआड हत्या, हत्येचा प्रयत्नाच्या घटना डोके वर काढत आहेत. गेल्या पाच महिन्यांत मुंबईत ७३ हत्या तर १६९ हत्येचा प्रयत्नांच्या घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे.
यावर्षी जानेवारी ते मे महिन्यात मुंबईत एकूण ३४ हजार २८५ गुन्हे नोंद झाले. यापैकी २८ हजार ८३२ गुह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा १९ हजार ५० होता. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला मुख्यत्वेकरून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरु होताच जूनपासून गुह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरुपात आले. यात चोरी, वाहन चोरीत वाढ झाली आहे. तसेच क्षुल्लक वादातून हत्या, हत्येचा प्रयत्नांच्या घटनाही वाढत आहेत.
यावर्षी मेपर्यंत ७३ हत्येच्या तर १६९ हत्येचा प्रयत्नांच्या घटना घडल्या. तर गेल्यावर्षी याच पाच महिन्यांत ५८ हत्या तर १२२ हत्येचा प्रयत्नांच्या घटनांची नोंद झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध जबाबदारींचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यात, रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढत आहे.
आकडेवारी मे २०२१पर्यंत...
वर्ष हत्या उकल हत्येचा प्रयत्न
२०१९ १६५ / १५८ ३४३/ ३३४
२०२० १४८/ १४१ ३४८/ ३३५
२०२१ ७३/ ६९ १६९/ १६१