"मोदींना शिव्या देणे हे सहिष्णुतेचे लक्षण आहे का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:37 AM2020-01-19T06:37:22+5:302020-01-19T06:38:24+5:30
डॉ. एस.एल भैरप्पा म्हणजे एक सर्जनशील कन्नड लेखक. त्यांच्या काही कादंबऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे दर्शन घडत असल्याच्या टीकेमुळे काही पुस्तके वादाच्या भोव-यात सापडली.
- नम्रता फडणीस
डॉ. एस.एल भैरप्पा म्हणजे एक सर्जनशील कन्नड लेखक. त्यांच्या काही कादंबऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे दर्शन घडत असल्याच्या टीकेमुळे काही पुस्तके वादाच्या भोव-यात सापडली. रविवारी त्यांच्या ‘साक्षी’ आणि ‘उत्तराकांड’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पुण्यात होणार आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद.
ज्या लेखकांचे विचार पटत नाहीत. त्यांना संपविण्याची मानसिकता तयार झाली आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला नाही का?
कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांचा खून झाला आहे. ही असहिष्णुताच आहे. त्यांच्या खूनाचा धिक्कार करतो. जे घडले ते चुकीचेच होते. तुम्ही एकतर्फी न्याय देऊ शकत नाही. मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की विचारस्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही काहीही बोलावे किंवा लिहावे? ही असहिष्णुता नाही का?
देशात ‘असहिष्णुते’चे वातावरण आहे असे म्हणायचे आहे का?
हो, आहे. प्रत्येक वृत्तपत्राचेही स्वत:चे एक विशिष्ट वैचारिक धोरण आहे. कुठल्याही चर्चेत प्रत्येक जण आपलीच विचारधारा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो. सगळ््या अंगाने विचार करणारी बहुआयामी आणि वस्तुनिष्ठ मांडणी कोण करते? अशी परिस्थिती आपल्या देशात आहे, याचे खरेच दुर्दैव वाटते.
सीएएवरून गदारोळ माजला आहे. तुमचं मत काय?
विरोधक चुकीच्या आधारावर गोष्टी पसरवत आहेत. भारतात मुस्लिम असुरक्षित आहेत असे म्हटले तर भारताला तेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणारी राष्टेÑ निर्यातीवर बंदी आणू शकतील. मोदी यांनी विरोधकांबाबत असे ओरडले तर चालेल का?
भारताची ‘हिंदू’ राष्ट्र करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे असे म्हटले जात आहे..
असे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे वाटत नाही. हिंदू बहुसंख्यांक आहेत म्हणूनच हा देश ‘सहिष्णू’ आहे.
जे कुणी लेखकांवर ‘प्रतिगामी’ आणि पुरोगामी’ असे शिक्के मारतात ते ‘माकर््सवादी’ आहेत. त्यांच्या विचारधारा किंवा टीकांना जर लेखकांनी समर्थन दिले तर मग ते ‘‘पुरोगामी’ ठरतात. त्यामुळे अशा आधुनिक समीक्षकांवर विश्वास ठेवायचे कारण नाही.
मोदी सरकार आल्याने चित्र बदलले असे म्हटले जाते, खरेच असे आहे का?
मोदी गुजरातचे १३ वर्षे मुख्यमंत्री होते. दुसºया बाजूला काही भारतीय लोकच मोदी कसे खुनी आहेत आणि त्यांना व्हिसा देऊ नका म्हणून अमेरिकन दूतावासाला पत्र पाठवतात. अमेरिका त्यांना व्हिसा नाकारते. याला ‘सहिष्णुता’ म्हणायचे का? मोदींबद्दल फक्त शिवीगाळच केली. मोदी इतके वाईट असते तर जनतेने मोदींना निवडून दिले असते का? मोदी दिल्लीत गेल्यानंतरही मग लोकांनी त्यांना कसे निवडून दिले? मोदींना शिव्या देणे हे सहिष्णुतेचे लक्षण
आहे का?