तुर्भे यार्डमध्ये धान्य भिजणार
By admin | Published: June 13, 2015 04:25 AM2015-06-13T04:25:52+5:302015-06-13T04:25:52+5:30
तुर्भे रेल्वे यार्डच्या छतावरील पत्रे तुटले आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्तीचे काम झालेले नाही. ताडपत्री लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात
नवी मुंबई : तुर्भे रेल्वे यार्डच्या छतावरील पत्रे तुटले आहेत. पाठपुरावा करूनही दुरुस्तीचे काम झालेले नाही. ताडपत्री लावून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात ताडपत्री फाटून गेली असून, पुढील चार महिने येथे धान्य व सिमेंट भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मालवाहतुकीसाठी महत्त्वाच्या यार्डमध्ये तुर्भेचा समावेश होतो. या ठिकाणी देशाच्या विविध भागातून सिमेंट, गहू व इतर धान्य येत असते. महिन्याला किमान २० वॅगन याठिकाणी येत असतात. मागील काही वर्षांपासून येथील समस्या वाढू लागल्या आहेत. रेल्वे धक्क्यावरील छताचे पत्रे तुटले आहेत. यामुळे पावसाळ्यात पाणी धक्क्यावर पडून तेथील धान्य व सिमेंट भिजते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी छतावर नवीन पत्रे टाकण्याची मागणी माथाडी कामगार संघटना व व्यापाऱ्यांनीही केली होती. परंतु रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहिलेले नाही. पावसाळ्यात येथील व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता असल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाने तुटलेल्या पत्र्यांच्या जागेवर ताडपत्री लावून तात्पुरती उपाययोजना केली. पावसामध्ये ताडपत्री टिकणार नसल्याचे सांगूनहीयाकडे दुर्लक्ष केले.
नवी मुंबईमध्ये गुरुवारी रात्री पडलेल्या पहिल्याच पावसामध्ये रेल्वे धक्क्याच्या छतावरील ताडपत्री उडून गेली आहे. अनेक ठिकाणी ताडपत्री फाटली आहे. पहिल्याच पावसात प्रशासनाचा निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे.
तत्काळ उपाययोजना केली नाही तर पावसाळ्यात येथील माल भिजून लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारी माल न मागविण्याची शक्यता आहे. माल आला नाही तर माथाडी कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामगारांमध्येही असंतोष निर्माण होवू लागला आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होवू लागली आहे.