Join us

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; 'त्या' घरावर कारवाई होणार? दारावर नोटीस लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 11:19 PM

कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत संपेनात! तुरुंगातील मुक्काम वाढला, नोटीसही आली

मुंबई: राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राणा दाम्पत्याला जामीन न मिळाल्यानं त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मुंबईतल्या घरावर पालिका कारवाई करण्याची शक्यता आहे. तशी नोटीस पालिकेनं राणांच्या घरावर चिकटवली आहे.

राणा दाम्पत्याचा मुंबई उपनगरातल्या खारमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम करण्यात आल्याचा ठपका मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. पालिकेचे अधिकारी ४ मे रोजी राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन पाहणी करतील. आवश्यक मोजमाप घेतील. त्यानंतर त्यांना अवैध बांधकाम हटवण्यासाठी मुदत दिली जाईल. अवैध बांधकाम न हटवलं गेल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहे. त्यामुळे त्यांच्या घरात सध्या कोणीही राहत नाही. पालिकेकडून त्यांच्या घराच्या दारावर नोटीस लावण्यात आली आहे. अवैध बांधकामाचा उल्लेख या नोटिशीत आहे. राणा दाम्पत्य कोठडीत असताना त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आल्यानं त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अचंबित झाले आहेत.

तुरुंगातील मुक्काम वाढला; पुढील सुनावणी ४ मे रोजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांची रवानगी तुरुंगात झाली. गेल्या आठवड्याभरापासून राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगात आहे. राणा यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला. न्यायालय ४ मे रोजी निकाल देणार आहे. त्यामुळे राणांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

सत्र न्यायालयाकडून आज निकाल अपेक्षित होता. अमरावतीमध्ये राणा समर्थक एकवटले होते. राणांना जामीन मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र अन्य प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणी आणि त्यामुळे वेळेचा अभाव यामुळे राणांच्या जामिनावर न्यायालयानं आज निकाल दिला नाही. आता पुढील सुनावणी ४ मे रोजी आहे. राणा दाम्पत्याला जामीन मिळणार की त्यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार, हा प्रश्नाचं उत्तर परवा मिळेल.

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणामुंबई महानगरपालिका