वाढता उकाडा मुंबईकरांसाठी तापदायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 04:01 AM2019-04-04T04:01:29+5:302019-04-04T04:02:19+5:30
राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान ४० अंशांवर : किनारपट्टीवासीयांना काहीसा दिलासा
मुंबई : राज्यभरात उष्म्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, कोकण वगळता उर्वरित राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा चढा असतानाच, किनाऱ्यावरील शहरांचे कमाल तापमान मात्र ३५ अंशाखाली नोंदविण्यात येत आहे. परिणामी, किनारपट्टीवरील शहरांना उर्वरित शहरांच्या तुलनेत किंचित दिलासा मिळत आहे. दुसरीकडे ‘ताप’दायक उन्हामुळे मुंबईकर घामाघूम होत असून, उत्तरोत्तर यात वाढच होत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच याच प्रदेशात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, राज्यभरात वातावरणाची दुहेरी स्थिती पाहायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता, आठवडाभरापासून मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी मुंबईचे कमाल तापमान ४० अंशाच्या घरात नोंदविण्यात येत होते. मात्र, बदलत्या वातावरणामुळे मुंबईला दिलासा मिळाला असून, मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मात्र, कमाल तापमान ३२ अंश असले, तरीदेखील तापदायक ऊन मुंबईकरांना घाम फोडत असून, वाढता उकाडा त्यांच्या त्रासात भर घालत आहे.
बुधवारचे शहरांचे कमाल तापमान
अहमदनगर ४२.४, अकोला ४२.७, अमरावती ४३, औरंगाबाद ४०.७, बीड ४२.४, बुलडाणा ४०.६, चंद्रपूर ४२.८, जळगाव ४२, जेऊर ४१, मालेगाव ४२.२, नागपूर ४१.५, नांदेड ४२.५, उस्मानाबाद ४२, परभणी ४२.६, सांगली ४०, सोलापूर ४२.८, उदगीर ४०.२, वर्धा ४२.२, यवतमाळ ४१.५ (अंश सेल्सिअस)