कलचाचणीचे प्रशिक्षण शिक्षकांना शाळा स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:13 AM2018-12-06T06:13:55+5:302018-12-06T06:13:57+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा आता मोबाइल अॅपवर होणार असून, राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे.
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा आता मोबाइल अॅपवर होणार असून, राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. अशाप्रकारे, कलचाचणी परीक्षा मोबाइलच्या माध्यमातून घेण्याबाबतचे प्रशिक्षणही दहावीच्या शिक्षकांना तालुका स्तरावर देण्यात येईल. प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी दहावीच्या शिक्षकांना दिले आहेत.
शिक्षण विभाग, विद्या प्राधिकरण आणि शामची आई फाउंडेशन यांनी मिळून हा उपक्रम सुरू केला असून, मोबाइलच्या माध्यमातून कलचाचणी परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात २ मास्टर ट्रेनर तयार करण्यात आले आहेत. ते प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना संबंधित मोबाइल अॅप कसे हाताळायचे, याचे प्रशिक्षण देतील.
दहावीच्या इयत्तेतील ५० विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १, त्यावरील विद्यार्थ्यांसाठी २ आणि १०० च्या पुढे पटसंख्या असल्यास शाळेतील ३ शिक्षकांना प्रशिक्षणास पाठवावे, असे आदेश शिक्षक निरीक्षकांनी दिले आहेत.
प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाइल फोन आवश्यक आहे. मुंबईत १० ते १२ डिसेंबर दरम्यान १००० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.