पोलीस आयुक्तांच्या भेटीमुळे महापौर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:13 AM2017-12-29T03:13:41+5:302017-12-29T03:13:59+5:30
मुंबई : हुक्का पार्लरवर बंदीसाठी थेट मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसेनेचाच रोष ओढवून घेतला आहे.
मुंबई : हुक्का पार्लरवर बंदीसाठी थेट मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिवसेनेचाच रोष ओढवून घेतला आहे. मुंबईचे प्रथम नागरिक असल्याने महापौरांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यास स्वत: जाणे हे शिष्टाचाराला धरून नाही, अशी नाराजी सेना नगरसेवक व शिवसैनिकांकडूनच व्यक्त होत आहे. महाडेश्वर यांनी शिष्टाचार मोडून महापौरपदाची शान घालवली असल्याचा घरचा अहेर शिवसैनिकांनी दिला आहे.
मुंबईत हुक्का पार्लर सर्रास सुरू असल्याने तरुण पिढी वाया जात आहे. त्यामुळे या पार्लरवर बंदी आणण्याची मागणी महापौरांनी पोलीस दलाकडे केलीे. मात्र ती करण्यासाठी महापौर स्वत: पोलीस आयुक्तालयात बुधवारी गेले होते. महापौरपद हे प्रतिष्ठेचे असल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांना आपल्या दालनात बोलावून कारवाईचे आदेश देणे अपेक्षित होते. मात्र या भेटीबाबत महापौरांनी पालिका प्रशासनालाही कल्पना दिली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या या भेटीबाबत शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पालिका आयुक्त पोलीस आयुक्तांना आपल्या दालनात चर्चा करण्यास बोलावतात, तर पालिका आयुक्तांना महापौर आपल्या दालनात बोलावून घेतात. त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना महापौरांनी भेटण्यास जाणे शिष्टाचारात बसत नाही. महापौरांसाठी स्वतंत्र राजशिष्टाचार अधिकारी असल्याने त्यांनी याबाबत महापौरांना सूचित करणे अपेक्षित होते, असा प्रश्न आहे.
>महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक असल्याने त्यांनी या पदाचा मान व शान राखणे अपेक्षित आहे.
- भालचंद्र शिरसाट,
प्रवक्ता, भाजपा
>महापालिकेचे सर्व निर्णय प्रशासन घेत असते, तर महापालिकेचे निर्णय महापौरांच्या माध्यमातून न होता, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहेत. यास सत्ताधारी शिवसेना विरोध करीत असली तरी या विरोधाला न जुमानता प्रशासन आपले काम करीत आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेना प्रशासनापुढे शरण जाण्याची मानसिकता तयार झालेली आहे. म्हणूनच असा प्रकार घडला असावा.
- राखी जाधव, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस