मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एस्प्लानेड दंडाधिकारी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आरोपी केले आहे.
गोस्वामी यांच्यासह एआरजी आउटलायर, मुख्य आर्थिक अधिकारी शिवा सुब्रमण्यम, प्रिया मुखर्जी आणि अन्य अधिकारी शिवेंद्र मुंढेरकर, अमित दवे, संजय वर्मा आणि संजय वालटकर यांचाही समावेश आहे. दुसरे आरोपपत्र सुमारे १६०० पानांचे आहे आणि त्यात आणखी ७ आरोपींचा समावेश आहे.
कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नऊ महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदवला. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यात रिपब्लिकन टीव्हीचा समावेश असल्याचे सांगितले. रिपब्लिकन टीव्हीसह बॉक्स सिनेमा, फक्त मराठी या वाहिन्यांचाही या घोटाळ्यात समावेश असून, त्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी अध्यक्ष पार्थो दासगुप्ताला लाच दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अधिक चाैकशी सुरू
हंसा रिसर्च ग्रुपद्वारे बार्कने याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली. सर्व आरोपींवर फसवणूक, फौजदारी स्वरूपाचा कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे इत्यादीअंतर्गत गुन्हा नोंदवला.