टीआरपी घोटाळ्याचा तपास १२ आठवड्यात करणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:06 AM2021-03-25T04:06:07+5:302021-03-25T04:06:07+5:30
राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा तपास १२ आठवड्यात पूर्ण करणार असल्याची ग्वाही ...
राज्य सरकारची उच्च न्यायालयाला ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टीआरपी घोटाळ्याचा तपास १२ आठवड्यात पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. दरम्यान, उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यापूर्वी ३ दिवसांची नोटीस जारी करावी, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने एआरजी आउटलायर मीडिया कंपनीची याचिका दाखल करून घेतली.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राला आव्हान देण्यास पोलिसांच्या करवाईपासून संरक्षण द्यावे, तपास सीबीआयकडे वर्ग करावा, या मागण्यांसाठी एआरजी आउटलायर मीडिया कंपनी व अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.
गेल्या सुनावणीत न्यायालयाने तपास गेले तीन महिने प्रलंबित असल्याने आणखी किती काळ चालणार? असा सवाल करत राज्य सरकारला याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मुख्य सरकार वकील दीपक ठाकरे यांनी बुधवारी हा तपास १२ आठवड्यात पूर्ण करू, अशी ग्वाही न्यायालयाला दिली. दरम्यान, न्यायालयाने गोस्वामी किंवा एआरजी आउटलायर कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची असेल तर त्यांना ३ दिवस आधी नोटीस द्यावी, असे निर्देश मुंबई पोलिसांना दिले. तर पोलिसांना तपसास पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश गोस्वामी यांना दिले. तसेच या याचिकांवरील पुढील सुनावणी २८ जून रोजी ठेवली.
..............................