मुंबई : अवजड वाहने १० वर्षांत भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणाला ट्रकचालकांनी विरोध दर्शविला असून सोमवार, २५ नोव्हेंबरपासून ते बेमुदत बंद पुकारणार आहेत, अशी माहिती भाईचारा आॅल इंडिया ट्रक आॅपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली.संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वनवे म्हणाले की, केंद्र सरकारने अवजड वाहनांची वयोमर्यादा १० वर्षे निश्चित केली असून १ एप्रिल २०२० पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. ही मर्यादा १५ वर्षांपर्यंत वाढवायला हवी. किंवा १० वर्षांनंतर रिकोन इंजीन बदलून ते वाहन १० वर्षे चालविण्याची परवानगी देण्यात यावी. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये जी रक्कम वाढविण्यात आली ती कमी करावी. डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणून कमी केले जावेत.टोल प्लाझाचा प्रत्येक ठिकाणचा वार्षिक टोकन निश्चित करणे गरजेचे आहे. देशात महामार्गावर प्रत्येक २०० किमीवर मोठ्या शहराबाहेर वाहनचालकांसाठी विश्रांतीगृह आणि वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. त्यामध्ये प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन वाहन चालविण्याचा परवानाही देण्यात यावा. वाहनांना रस्ता कर, टोल, प्रत्येक राज्यात सीमा कर आकारला जातो. इतके सर्व कर न आकारता एकच योग्य कर आकारण्यात यावा. अवाजवी मालाची वाहतूक करत असलेल्या वाहनांना तत्काळ रोख लावण्यात यावी, अशा अनेक मागण्याही त्यांनी केल्या आहेत.अत्यावश्यक सेवांना वगळलेट्रकचालकांच्या बंंदमध्ये अवजड वाहनचालक सहभागी होणार आहेत. मात्र, या बंंदमधून राज्यातील अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि दूधपुरवठा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती भाईचारा आॅल इंडिया ट्रक आॅपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली.
ट्रकचालकांचा आजपासून बेमुदत बंद, अवजड वाहने १० वर्षांत भंगारात काढण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 8:20 AM