मुंबई : बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या संघटना हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात संबंधित संघटनांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेसने वेळोवेळी हे सांगितले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त सांस्कृतिक संघटना राहिली नसून ती एक राजकीय संघटना झाली आहे. केंद्र आणि विविध राज्यातील भाजपा सरकारमध्ये संघाचे लोक महत्त्वाच्या हुद्द्यावर बसले आहेत. विविध संस्थावर संघाचे लोक नेमले आहेत. सीआयए ही गुप्तचर संघटना असल्यामुळे त्यांच्याकडे नक्कीच काही गुप्त अहवाल, पुरावे असतील. ते मागवून घ्यावेत आणि त्याची पडताळणी करून या संघटनांवर कायदेशीर कारवाई करायला हवी.
इंधनाचे दर कमी करा : इंधनाचे दर वाढविल्यामुळे महागाई वेगाने वाढत आहे. इंधनावर लावलेले अन्याय्य कर आणि विविध अधिभारामुळे देशभरात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात आहे. पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून सर्वसामान्यांची लूट थांबवावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.