Join us

तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत

By मनोहर कुंभेजकर | Published: May 09, 2024 7:24 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे विभाजन झाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे विभाजन झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह दिले. मात्र आदर्श आचार संहितेच्या पालनामुळे सरकारी कार्यक्रम आणि राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, मिरवणुका, जाहीर सभा आणि अन्य राजकीय कार्यक्रमांमध्ये तुतारी वादकांना बोलावणे बंद झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांना कामे मिळत नाही, तर गुरू बळ नसल्याने सध्या लग्नांचे मुहूर्त नसल्याने त्यांच्या मिळकतीवर गंडांतर आले आहे.

कशी असते तुतारीतुतारी (स्त्रीलिंगी नाम; अनेकवचन: तुताऱ्या) हे भारतीय उपखंडात, विशेषकरून महाराष्ट्रात, प्रचलित असणारे एक सुषिर (म्हणजे तोंडाने फुंकून वाजवण्याचे) वाद्य आहे. ही आकडेबाज वळणाची, म्हणजे साधारणतः इंग्रजी 'सी' किंवा 'एस' आकाराची असते व तिचा आकार वाजविणाऱ्याच्या तोंडाकडे निमुळता होत आलेला असतो. सर्वसाधारणपणे, हे पितळेचे किंवा प्राण्यांच्या शिंगाचे बनविलेले असते. मात्र सध्या अन्य धातू व मिश्रधातूंमध्येही तुताऱ्या बनवल्या जातात.

आम्हाला निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमांना आवर्जून बोलावले जात असे. एका तुतारी वादकाला खाजगी कार्यक्रमांना किमान 5 ते 6 हजार रुपये,तर सरकारी कार्यक्रमांना 3 हजार रुपये मिळत होते. मात्र लोकसभा निवडणूक आचार संहिता लागल्यावर तुतारी चिन्हामुळे आम्हाला राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या निवडणुक प्रचाराच्या विविध कार्यक्रमांना बोलावणे बंद झाले आहे.त्यामुळे सध्या आमची कामे कमी झाली आहेत.

विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार उभे होते,त्याठिकाणी आम्हाला तुतारी वाजवायला बोलावणे आले नाही. अजून मुंबईतील उमेदवारांच्या कार्यक्रमांना सुद्धा आम्हाला निमंत्रण मिळाले नाही. तर दि,1 मे च्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आचार संहितेमुळे आम्हाला बोलावले नाही. - पांडुरंग गुरव, तुतारी वादक, कांदिवली (पूर्व)

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४राष्ट्रवादी काँग्रेस