Join us

धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 6:28 PM

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बजरंगण सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे, बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यांनी धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, या प्रवेशामुळे त्यांची पुन्हा एकदा बीडमधील लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गतपंचावार्षिक निवडणुकीतही त्यांनी प्रीतम मुडेंविरुद्ध राष्ट्रवादीकडून निवडणूल लढवली होती. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनावणे हेही उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्याच पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी आज बीडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार संदीप क्षीरसागर हेही उपस्थित होते. दरम्यान, या प्रवेशामुळे आता अजित पवार गटाला निलेश लंके यांच्यानंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे हे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. गेल्या काही दिवसापासून सोनावणे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदार संघाची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वीच बजरंग सोनावणे यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते पंकजा मुंडेंविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरतील, असे दिसून येते. 

दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांच्या पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडेअजित पवारमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४बीड