डिक्कीचे योगदान महत्त्वपूर्ण
By admin | Published: March 28, 2016 02:15 AM2016-03-28T02:15:16+5:302016-03-28T02:15:16+5:30
नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण
मुंबई : नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डिक्की, सामाजिक न्याय विभाग, बार्टी, सूक्ष्म व लघुउद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे आयोजित ५व्या राष्ट्रीय ट्रेड फेअर अँड एक्सपो-२०१६ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप उद्योगमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, आंध्र प्रदेशचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रावल किशोर बाबू, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांसाठी अर्थसंकल्पात धोरण जाहीर केले असून, या धोरणांतर्गत त्यांना प्रशिक्षण व आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या २८० औद्योगिक क्षेत्रात अनुसूचित जाती-जमातीतील तरुण उद्योजकांसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आले असून, ते बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार उद्योगस्नेही असल्यामुळे याचा लाभ उद्योजकांनी घ्यावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.
राज्यात १० ठिकाणी टेक्सटाइल पार्क उभारण्यात येत असून, यात १००पेक्षा जास्त उद्योग येऊ शकतात. या ठिकाणी उद्योग उभारणाऱ्यांना ३५ टक्के अनुदान देण्यात असून, पणन महामंडळाच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांनी केले.
डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी डिक्कीच्या १० वर्षांच्या प्रवासाचा आढावा या कार्यक्रमावेळी घेण्यात आला. यावेळी देशभरातील डिक्कीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.