मराठी माणसाला घर देणार नाही, म्हणत महिलेला घर नाकारले; मनसेने हिसका दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:52 PM2023-09-27T23:52:29+5:302023-09-27T23:59:19+5:30
Trupti Sagar Deorukhkar Video Viral: तृप्ती या पतीसोबत मुलुंड वेस्टला ऑफिससाठी घर पहायला गेल्या होत्या. त्यांना महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचे सांगत घर नाकारण्यात आले होते.
मराठी माणसाला घर देणार नाही म्हणत मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तृप्ती यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राजकीय पक्षांनी मराठीच्या नावावर राजकारण करणे बंद करावे, शिवाजी महाराजांचे नावही घ्यायचे बंद करावे असे म्हणत संताप व्यक्त केला होता. यावर मनसेने आक्रमक होत तृप्ती यांना घर देण्यास नकार देणाऱ्यांना माफी मागायला लावली आहे.
तृप्ती या पतीसोबत मुलुंड वेस्टला ऑफिससाठी घर पहायला गेल्या होत्या. त्यांना महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचे सांगत घर नाकारण्यात आले होते. तसेच यावर जाब विचारला असता तृप्ती यांचा हात पकडून पतीला धक्काबुक्की करण्यात आली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तींना जाब विचारला. त्या व्यक्तीला माफीही मागायला लावली गेली.
तृप्ती यांनी काय म्हटले...
मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवले. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेले होते. त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरे देणार नाही असे म्हटले. असे कुठे आहे का, असे विचारले तेव्हा धमकी देण्यात आली. तसेच पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणालाही सांगा म्हणत आपला हात पकडल्याचा आरोप तृप्ती यांनी केला. तसेच हे माझे रडणे नाही तर संताप असल्याचे त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंकडून संताप...
चीड आणणारी घटना आहे. पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या. तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून विचारला आहे.
नाना पटोलेंची टीका
मुंबई मध्ये आता मराठी माणसाला च जागा नाहीय का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत हे बघितले पाहिजे,केंद्रातील भाजपा सरकार मुंबई मराठी माणसापासून परिणामी महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करत आहे. राज्यातील येड्याचे सरकार हे दिल्लीश्वरा समोर झुकलेले आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत? भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण मागील आठवड्यात एका भाजप खासदाराच्या भाषेतून बघितला. हा द्वेष आता मराठी माणसाकडे यायला लागला का ? असे विचारत त्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.