Join us

पतीच्या कामावरच ‘भिस्त’

By admin | Published: February 12, 2017 4:00 AM

अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. हक्काचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे नगरसेवकांनी पत्नीला

- स्नेहा मोरे, मुंबई

अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. हक्काचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे नगरसेवकांनी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले खरे; मात्र आतापर्यंत कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या या उमेदवारांची अडचण झाली. त्यामुळे नगरसेवक पतीने केलेल्या नागरी कामांचा पाढा वाचत मतांचा जोगवा मागत महिला उमेदवार दारोदार फिरत आहेत. भायखळा ‘ई’ विभागातील प्रभाग क्रमांक २१० हा अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाल्याने या ठिकाणी विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांच्या पत्नी यांच्यात लढत रंगणार आहे. या प्रभागातील काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक मनोज जामसुतकर यांची पत्नी सोनम जामसुतकर उमेदवार आहेत. तर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव ही निवडणूक लढत आहे. या दोघींनीही प्रचाराकरिता आपल्या पतीने केलेल्या कामाचा पाढा मतदारांसमोर वाचण्यास सुरुवात केली आहे. तसेच, यामिनी जाधव यांनी कार्यअहवालाच्या पत्रकावरही पतीच्या कार्यकाळातील केलेल्या कामांवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘डी’ विभागात प्रभाग क्रमांक २१६मध्ये शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि नगरसेवक अरविंद दूधवडकर यांच्या पत्नी अरुंधती दूधवडकर रिंगणात आहेत.तर भांडुपमध्येही प्रभाग क्रमांक ११०, १११ आणि ११६ या ठिकाणी फेररचनेमुळे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये आशा कोपरकर, सारिका पवार, भारती पिसाळ आणि मीनाक्षी पाटील यांनी पतीने केलेल्या कामाचा आधार घेतला आहे. तर दहिसर येथील प्रभाग क्रमांक ८मध्ये शिवसेनेने अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे आता एकंदरित, राजकारणात पतीच्या कार्याचा दाखला देत नव्याने प्रवेश करणाऱ्या उमेदवार पत्नींवर मतदार कृपा करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दादरमध्येही धडपड दादरमध्ये प्रतिष्ठेची लढत असणाऱ्या प्रभाग १९१मध्ये मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या पत्नी रिंगणात आहेत. प्रभाग फेररचेनचा फटका बसल्याने पतीच्या कामकाजावर मत मागण्यासाठी उमेदवार वणवण करीत आहेत. तर लालबाग-परळमधील प्रभाग क्रमांक २०३मधील शिवसेनेचे बंडखोर नाना आंबोले यांच्या पत्नीला तेजस्विनी आंबोले यांना भाजपातून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणीही विद्यमान नगरसेवक असणाऱ्या पतीच्या कामाकडे मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.