मुंबई : सोशल मीडियावरील हवामानाच्या अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी नागरिकांनी हवामानाची तंतोतंत माहिती मिळविण्यासाठी हवामान खात्याच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे यांनी केले.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग, असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्सच्या वतीने उष्णतेच्या लाटा आणि वार्तांकन या विषयावर आयोजित संवादात्मक कार्यक्रमात कांबळे बोलत होते. सोशल मीडियावर अकाउंटवरून दिल्या जाणाऱ्या हवामान अंदाजाबाबत कांबळे म्हणाले, हवामानाचे अंदाज वर्तविण्याबाबत संबंधितांकडून कोणते प्रोडक्ट वापरले जातात? याची माहिती नाही किंवा यावर बोलण्याऐवजी हवामान खात्याकडून याची इत्थंभूत माहिती दिली जाते.
शेतकऱ्यांना फायदा-
राज्यातील शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी पाच दिवसांचे अंदाज दिले जातात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मुंबई परिसरात दोन डॉप्लर रडार असून, याद्वारे पावसाचे अंदाज वर्तविणे सोपे झाले आहे. पावसाचे मोजमाप करण्यासाठी महापालिका आणि हवामान खात्याकडून पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत.
कधी येतो मान्सून?
मान्सूनचा अंदाज वर्तविताना चार दिवस आणि चार दिवस नंतर असे दिवस गृहीत धरले जातात. त्यामुळे वर्तविलेल्या तारखेच्या आधी किंवा नंतर चार दिवस मान्सून दाखल होतो.
ऊन आणि मतदान-
निवडणूक आयोगाला उन्हाळ्यातील तापमानाबाबत माहिती दिली जाते. त्यानुसार, मतदानप्रक्रियेत काळजी घेतली जात आहे. रात्री १२ वाजताही राहतोय अपडेट हवामानात होत असलेल्या बदलाची माहिती देण्याचे काम वाढले आहे. ६ ते ७ शास्त्रज्ञ घरूनही काम करत आहेत. रात्री १२ वाजताही हवामानाचे अपटेड दिले जात आहेत.