मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आयआयटीच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ४४५ पुलांचे आॅडिट करण्यात येईल, अशी घोषणा मंगळवारी केली. यामुळे रेल्वे अधिका-यांमध्ये नाराजी असून ‘रेल्वेमंत्री, तुमचा आमच्यावर भरोसा नाय का?’ अशी विचारणा होत आहे.एल्फिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू तर ३९ प्रवासी जखमी झाले होते. त्या वेळी पीयूष गोयल यांनी पादचारी पूल ‘रेकॉर्ड’ वेळेत बांधण्यासाठी लष्कराला पाचारण केले होते. लष्कराने एल्फिन्स्टन-परळसह करी रोड आणि अंबिवली येथे पादचारी पूल उभारले. त्यानंतर आता अंधेरी पूल दुर्घटनेत ५ प्रवासी जखमी झाले. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर ४४५ पुलांचे आयआयटीसह रेल्वे, पालिका अधिकाºयांचे पथक आॅडिट करेल.रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, एल्फिन्स्टननंतर ‘लष्कर’ आणि अंधेरीनंतर ‘आयआयटीला’ पाचारण केल्याने रेल्वे कर्मचाºयांमध्ये ‘चलता है...’ ही वृत्ती बळावेल. रेल्वेमध्ये विविध कर्मचारी असे आहेत ज्यांची केवळ पूल, आॅडिटसंबंधी कामासाठी नियुक्ती केली आहे. दोषींवर कारवाईचा बडगा उगारल्यास रेल्वे अधिकारी सजग बनत काम करतील. अन्य विभागांतील अधिकाºयांनी आॅडिट करणे हे रेल्वे कर्मचाºयांवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे.
आमच्यावर भरोसा नाय? रेल्वेमंत्र्यांना कर्मचाऱ्यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:46 AM