आम्ही नागरी स्वातंत्र्याचे रक्षक, आमच्यावर विश्वास ठेवा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 06:46 AM2022-12-18T06:46:25+5:302022-12-18T06:47:04+5:30
भारताचे माजी ॲटर्नी जनरल दिवंगत अशोक देसाई यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कायदा आणि नैतिकता - सीमा व पोहोच’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील कोणत्याही न्यायालयासाठी कोणतेही प्रकरण लहान किंवा मोठे नाही. कारण नागरिकांचा विश्वास, कायद्याची योग्य प्रक्रिया आणि स्वातंत्र्याचे संरक्षण हे आपल्यावर टिकून आहे, असे स्पष्ट करीत नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षक म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी येथे केले.
भारताचे माजी ॲटर्नी जनरल दिवंगत अशोक देसाई यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कायदा आणि नैतिकता - सीमा व पोहोच’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. सरन्यायाधीशांच्या आवाहनाला केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत सर्वोच्च न्यायालयासंबंधी केलेल्या टिप्पणीचा संदर्भ होता. सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जांवर सुनावणी न घेता घटनात्मक प्रकरणांवर सुनावणी घ्यावी, असा सल्ला रिजिजू यांनी दिला होता.
दिवंगत ॲटर्नी जनरल अशोक देसाई यांनी प्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक वादग्रस्त ठरल्यानंतर ॲड. अशोक देसाई यांनी या नाटकाची न्यायालयात प्रभावीपणे बाजू कशी मांडली, याच्या आठवणीही न्या. चंद्रचूड यांनी जागविल्या.
अशोक देसाईंची अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याप्रती असलेली बांधीलकी पाहून कलाकार, पत्रकार, लेखक यांना आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करू शकतो, याची खात्री पटली. कारण त्यांना देसाई यांचा पाठिंबा होता, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ॲड. अशोक देसाई यांचे कुटुंब उपस्थित होते.
आपले संविधान नैतिक शिक्षण देणारे दस्तऐवज आहे, जे आपल्या समाजात नैतिक आचारसंहिता निर्माण करण्याच्या उद्देशासाठी आहे. आपली राज्यघटना लोक जसे आहेत, तसे स्वीकारण्यासाठी नाही. तर लोक कसे असायला हवेत, हे शिकविण्यासाठी आहे.
- धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश