मुंबई : आयुष्य वेगवान आहे. त्याचा आस्वाद आपण घ्यायला पाहिजे. याचवेळी सत्य हे शाश्वत आहे, हेही लक्षात ठेवायला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. सत्य हे खूप उच्च आहे, पण सत्य हेच जीवन आहे, असेही सिंग यांनी सांगितले.सायन येथील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी द साऊथ इंडियन्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘नॅशनल एमिनेन्स अॅवॉर्ड २०१८ पुरस्कार’ सोहळा पार पडला. याप्रसंगी मनमोहन सिंग यांना पब्लिक लीडरशिप, मंजूळ भार्गव यांना कम्युनिटी लीडरशिप आणि एज्युकेशन, व्ही. के. सारस्वत यांना सायन्स आणि टेक्नोलॉजी, स्वामी चिदानंद सरस्वती यांना समाजसेवा या विषयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. द साऊथ इंडियन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व्ही. शंकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.मनमोहन सिंग म्हणाले की, माझ्या आयुष्याची सुरुवात एका छोट्याशा गावामधून झाली आहे. गाह या गावात माझा जन्म झाला. आता हे गाव पाकिस्तानात आहे. फाळणीनंतर माझे कुटुंब अमृतसर येथे राहू लागले. मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून मी शिक्षण घेतले. मी शिक्षक म्हणूनदेखील काम केले आहे. १९८५ साली मी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा गव्हर्नर म्हणून काम पाहिले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी मला अर्थमंत्रीपद दिले. त्यानंतर मला देशाचे पंतप्रधानपद मिळाले.मंजूळ भार्गव म्हणाले की, मी खूप आनंदी आहे. राष्ट्रीय गणित दिवशी माझा सन्मान झाला. स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले की, आपल्यासाठी आपले पर्यावरण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्यासाठी पुढे आले पाहिजे. पाणी हे जीवन आहे, त्यामुळे पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.
सत्य हेच जीवन आहे - मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 4:54 AM