Join us

आता विनाचाचणी करा विमान प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी मुंबई विमानतळाची विशेष योजना; दिल्ली, गुजरातसह दक्षिणेकडील राज्यांसाठी फेऱ्यांचे नियोजनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे ...

पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी मुंबई विमानतळाची विशेष योजना; दिल्ली, गुजरातसह दक्षिणेकडील राज्यांसाठी फेऱ्यांचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे वार्षिक सहलींचे नियोजन रद्द केलेल्या पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी मुंबई विमानतळाने योजना तयार केली आहे. कोविड चाचणीच्या निर्बंधातून शिथिलता दिलेल्या राज्यांमध्ये विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, यात दिल्ली, गुजरातसह दक्षिणेकडील काही ठिकाणांचा समावेश आहे.

कोरोनाने शिरकाव केल्यापासून नागरिकांच्या मुक्त संचारावर मर्यादा आल्या आहेत. नोकरदारवर्ग ‘वर्कफ्रॉम होम’मुळे आणि विद्यार्थी शाळा बंद असल्याने घरात आहेत. जानेवारीपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे कोरोनाकाळातील मानसिक थकवा दूर करण्यासाठी अनेकांनी सहलींचे नियोजन केले. मात्र, मार्चमध्ये दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने त्यांचा हिरमोड झाला.

आता दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने सहलींच्या नियोजनाकडे कल वाढला आहे. मात्र, बहुतांश विमानतळांवर कोरोना चाचणीचे बंधन कायम असल्याने बरेचजण हवाईमार्गे प्रवास टाळत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विमानतळाने कोरोना चाचणीचे निर्बंध शिथिल केलेल्या राज्यांत विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यात दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरातचा समावेश आहे. सध्या गुजरातमधील बडोदा आणि राजकोटसाठीच नियोजन केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

* काय पाहता येईल?

- दिल्ली - कुतुबमिनार, लाल किल्ला, हुमायूनची कबर

- आंध्रप्रदेश - तिरुपती बालाजी, व्यंकटेश मंदिर, तिरुमाला टेकड्या

- तेलंगणा - चारमिनार, गोवळकोंडा किल्ला

- कर्नाटक - कोडागुच्या सदाहरित टेकड्या, विजयनगर साम्राज्याचे प्राचीन अवशेष, गोकर्ण

- तमिळनाडू - द्रविड शैलीतील मंदिरे, मदुराई मीनाक्षी अम्मान मंदिर, उटी

- गुजरात - जंगल सफर, बडाेद्याचा राजवाडा

-------------------------------