व्हिसा नियमांमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करु- लंडनचे महापौर सादिक खान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:17 PM2017-12-04T17:17:33+5:302017-12-04T17:19:15+5:30
सादिक खान कालपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. लंडनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी हा त्यांचा दौऱ्यामागचा हेतू आहे.
मुंबई- इंग्लंडमधील व्हिसाच्या कडक नियमावलीवर जगभरातून टीका होत असल्यामुळे या नियमांमध्ये बदल करु असे आश्वासन लंडनचे महापौर सादिक खान यांनी दिले आहे. सादिक खान सध्या भारताच्या भेटीवर आहेत. शिक्षणानंतर कामासाठी मिळणाऱ्या व्हिसाबाबत धोरणांमध्ये बदल केला जाईल असे खान यांनी सांगितले आहे.
व्हिसा नियमांवरुन इंग्लंडवर टीका होत असल्यामुळे लंडनमध्ये जास्तीतजास्त गुंतवणूक यावी यासाठी आपण नियमांमध्ये बदल करावा यासाठी ब्रिटिश सरकारकडे लॉबिंग करत असल्याचे खान यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात सांगितले. सादिक खान यांनी थेरेसा मे यांच्या व्हिसा धोरणावरही टिका केली. 'एकीकडे तुम्ही भारतीय उद्योजकांना इंग्लंडमध्ये गुंतवणूक करण्यास सांगता आणि दुसऱ्या बाजूस त्यांच्यावर कडक व्हीसा नियम लादता' अशा शब्दांमध्ये त्यांनी थेरेसा मे यांच्या सरकारवर टीका केली. सादिक खान कालपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. लंडनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी हा त्यांचा दौऱ्यामागचा हेतू आहे. आम्ही केवळ उद्योगच नाही तर शिक्षण आणि सांस्कृतीक विषयांमध्येही संबंध वाढविण्यास इच्छूक आहे असे स्पष्ट करत खान यांनी इंग्लंडमधील भारतीय समुदायाचे कौतुक केले. भारतीय समुदायाने इंग्लंडच्या सांस्कृतीक विकासासाठी मोठे येगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
युरोपियन युनियनच्या बाहेरील देशांसाठी इंग्लंडने आपले नियम बदलण्याचे थेरेसा मे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी नियमावलीत बदल केला. यामुळे भारतीय विद्यार्थी तसेच उद्योजकांना इंग्लंडचा व्हिसा मिळवताना अधिक त्रासाचे होणार आहे.