'माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 01:02 AM2018-10-30T01:02:27+5:302018-10-30T01:02:39+5:30
अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन; वर्षा पवार-तावडे यांच्या ५० कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन
मुंबई : ‘मनाला दार असतंच’ या काव्यसंग्रहामध्ये कुटुंबातील नाती-गोती या विषयावर काव्य आहे, ‘स्त्री’ची एक वेगळी ओळख उलगडणारे काव्य आहे, त्याचप्रमाणे माणसाला माणूस म्हणून समजावून घेण्याचा प्रयत्न या कवितांमधून करण्यात आला आहे. एक संवेदनशील महिला आणि कार्यकर्ती या दोन्ही भूमिकांतून व्यक्त होत, एकत्रितपणे हा काव्यसंग्रह मांडण्यात आला आहे, असे उद्गार आगामी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी काढले.
वर्षा पवार-तावडे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये लिहिलेल्या ५० कवितांचा संग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे रविवारी प्रकाशित करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते आणि भारतीय स्त्री शक्तीच्या निर्मला आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
‘विचार, कल्पना म्हणजे कविता नव्हे, तर शब्द म्हणजे कवितांच्या खुणा असतात. मात्र वर्षा पवार-तावडे यांनी पहिल्या काव्यसंग्रहाची निर्मिती करताना यापलीकडे जाऊन वेगळा विचार केला असल्याचे त्यांच्या कवितांमधून जाणवते. साधे लिहिणे आणि साधे राहणे हे कठीण असते. त्यातही स्वत:शी संवाद साधणे आणखी कठीण असते. त्यात अडचणी असतात. या कवितांमधून लेखिकेने मुखवट्यांशिवाय विचार केला आहे, या शब्दांत ढेरे यांनी त्यांचे कौतुक केले.
या वेळी निर्मला आपटे यांनी वर्षा पवार-तावडे यांचे कार्यकर्ता म्हणून केलेल्या कार्याचे विवेचन केले. त्यांनी स्त्री शक्तीमध्ये काम करताना त्या कशा सजग असतात हे नमूद केले. मृणाल कुलकर्णी यांच्या जोडीने अभिनेते कवी किशोर कदम यांनीसुद्धा या कवितांचे मनाला भावणारे वाचन केले. काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी व्यासपीठावर नेपथ्याचीही रचना करण्यात आली होती. कार्यकर्ता म्हणून जग अनुभवताना मी लिहीत होते, मात्र कविता करावेसे वाटले नव्हते, असे सांगत वर्षा पवार-तावडे यांनी आपल्या प्रवासाबद्दल उपस्थितांशी गप्पा मारल्या. आलेले फॉरवर्ड वाचता वाचता अस्वस्थपण आले, त्याला उत्तर देण्यासाठी कवितांचा पर्याय समोर आला. लेख कमी वाचले जातात, या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात पोहोचावी म्हणून हे घडत गेले, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.