तुमचे वजन वापरुन बघा, मुख्यमंत्र्यांवर टीका करताच आव्हाडांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:36 AM2021-04-03T08:36:59+5:302021-04-03T09:58:53+5:30
फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन जगभरातील देशांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये जनतेला दिलेल्या पॅकेजी आणि सुविधांनी यादीच जाहीर केली.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. विरोधक व्वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असे सांगत उद्धव ठाकरेंना फेसबुकवरुन प्रतिटोला लगावला आहे. त्यामुळे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन जगभरातील देशांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये जनतेला दिलेल्या पॅकेजी आणि सुविधांनी यादीच जाहीर केली. तसेच, युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच जनेताला काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!. विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही, बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून.., असा टोला आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ....आपले केंद्र सरकार काय देणार ...अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही ... बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavishttps://t.co/QH60dZJHLn
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
काय म्हणाले मुख्यमंत्री
ब्राझील, फ्रान्स, बल्गेरिया, रशिया मधल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी देत तिथं लादण्यात आलेल्या कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत सांगून विरोधकांवर निशाणा साधला. "देशाबाहेर कोरोनाची स्थिती भयंकर होत चालली आहे. अनेक ठिकाणी आजही लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लादलेले आहेत. पण, आपण राज्यातील जनतेचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार करुन अद्याप तरी लॉकडाऊन केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी कोरोनाचं राजकारण करू नये. उलट त्यांनी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांसाठी मदत करण्याची भूमिका घ्यावी", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.
दोन दिवसांत कठोर नियमावली जाहीर करणार
मुख्यमंत्र्यांनी यावेळी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी इशारा देत आहे, असं सांगत येत्या दोन दिवसांत राज्यात नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तसेच अशीच रुग्णवाढ सुरू राहिली तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यातील उपलब्ध आरोग्य संसाधनं कमी पडू लागतील आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट निर्वाणीचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे