बेस्टचा संप मोडून काढण्याचे प्रयत्न, आज तोडगा अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 06:05 AM2019-01-10T06:05:18+5:302019-01-10T06:05:26+5:30
दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही : कर्मचाºयांवर मेस्मांतर्गत कारवाई, कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात
मुंबई : शिवसेनेने माघार घेतल्यानंतरही बेस्ट कामगार संघटनांचा संप सुरूच राहिला. शिवाय ५०० बस गाड्या रस्त्यावर आणण्याचा सत्ताधाºयांचा दावाही फोल ठरला. स्वपक्षीय संघटनेतच फूट पडल्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली. याउलट संपाच्या दुसºया दिवशी दुपारपर्यंत केवळ ११ बसगाड्या रस्त्यावर धावल्या. त्यामुळे संप मोडून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली. मात्र कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे उद्याही हाल होणार आहेत.
वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईतील २५ लाख प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या संपाला दिलेला नैतिक पाठिंबा शिवसेनेने मंगळवारी काढून घेतला. त्यानंतर बेस्ट कामगार सेनेतील ११ हजार सभासद बुधवारी कामावर रुजू होतील, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला होता. मात्र कामगारांमध्ये रोष असल्याने शिवसेनेच्या संघटनेतच फूट पडल्याचे दिसून आले.
कामगार सेनेच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी महाव्यवस्थापकांबरोबर कामगारांच्या मागण्यांवर चर्चा केली. मात्र कृती समिती चर्चेपासून बाहेरच राहिल्यामुळे कामगार कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने कामगारांवर कारवाईला सुरुवात केली. याचे तीव्र पडसाद उमटून कामगारांमध्ये रोष पसरल्याने बेस्ट वसाहतींमध्ये तणावाचे वातावरण होते. दुपारनंतर महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी पुन्हा एकदा कृती समितीचे नेते शशांक राव यांना चर्चेला बोलावले. मात्र लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे त्यांनी संपातून माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे संप उद्याही सुरूच राहणार आहे.
शिवसेनेची नाचक्की
महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला हा संप टाळता आला नाही. संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतल्यानंतरही शिवसेनेला आपला करिष्मा दाखविता आलेला नाही. याउलट शिवसेनेने संपातून माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिकाºयांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे.
बेस्टचे सहा कोटींचे नुकसान
बेस्ट उपक्रमाला दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दोन दिवसांत एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाचा दोन दिवसांचा महसूल बुडाला. वडाळा, वरळी, वांद्रे आगारातील ११ बसगाड्या सकाळी बस आगाराबाहेर पडल्या. मात्र या बसगाड्याही काही तासांनी बस आगारांमध्ये परतल्या.
कारवाईला विरोध
कृती समितीचे नेते शशांक राव यांनी तीव्र संताप व्यक्त करीत वडाळा बस आगारावर कर्मचारी कुटुंबातर्फे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी अशी कारवाई होत असल्यास थेट स्वाभिमान संघटनेला कळविण्यास सांगितले आहे.
कामगारांवर कारवाई
बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरविला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.
सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री
बेस्ट उपक्रमाच्या तीन हजार २०० गाड्या आहेत. पैकी २८०० गाड्या रस्त्यावर धावतात. या गाड्यांमधून २५ लाख मुंबईकर दररोज सकाळ-संध्याकाळ प्रवास करतात. ही सेवाच गेले दोन दिवस ठप्प असल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. कमी अंतराचे बसभाडे आठ रुपयांपासून सुरू होते. मात्र बसगाड्याच नसल्याने प्रवाशांना याच प्रवासासाठी रिक्षा-टॅक्सी व खाजगी वाहनांना ३० ते ४० रुपये वा त्याहून जास्त पैसे मोजावे लागले.
आज तोडगा अपेक्षित
यापूर्वी झालेले बेस्ट कामगारांचे संप दोन दिवस चालले. दुसºया दिवशी मात्र शिवसेना पक्षप्रमुख अथवा राज्य सरकारच्या मध्यस्थीने संप मिटविण्यात आला आहे. परंतु या वेळेस दुसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीड दौºयावर असल्याने ते उद्या मुंबईत आल्यानंतर आयुक्त अजय मेहता, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आणि सर्व कामगार संघटनांबरोबर चर्चा करणार आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.