अंधेरीला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रयत्न
By admin | Published: November 9, 2015 03:04 AM2015-11-09T03:04:34+5:302015-11-09T03:04:34+5:30
प्रभाग क्र.६२ चे भाजपा नगरसेवक अमित साटम अंधेरी (प़) विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव आणि भारतीय कामगार
मनोहर कुंभेजकर , मुंबई
प्रभाग क्र.६२ चे भाजपा नगरसेवक अमित साटम अंधेरी (प़) विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांना पराभूत करून ते आमदार बनले. आमदार आणि नगरसेवक अशी दुहेरी जबाबदारी ते सध्या पार पाडत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी विकासकामांवर भर दिला आहे. अंधेरीला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वर्सोवा चौपाटीवरील अनेक वर्षांपासून असलेल्या सुमारे १०० अनधिकृत झोपड्या, मेथीची चालणारी शेती आणि विहिरींवर अधिकाऱ्यांचा ताफा नेऊन ठोस कारवाईस भाग पाडले. अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि १५ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर कारवाईस भाग पाडले. पालिकेचे नियोजित फेरीवाला धोरण रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. वर्सोवा चौपाटीचे सुशोभिकरण करून एमटीडीसीच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे वॉटर स्पोटर््स लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधेरीतील हेरिटेज ग्रेड -१ मध्ये असलेल्या गिल्बर्ट टेकडीला जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जुहू बीचच्या सुशोभिकरणाला लवकर सुरुवात होणार आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जुहू आणि वर्सोवा बीच यांना जोडणारा मुंबईतील पहिला बीच वॉक सुरू करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अंधेरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाला येत्या जानेवारीत सुरुवात होणार आहे. अंधेरी कब्रस्तान, मनीषनगर, पंचमनगर, सातबंगला, इर्ला मशीद, रामदेव मास्टर चाळ, आंबोली, सैनिकनगर, रतननगर येथे एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत मुंबईतील पहिले सुंदर उद्यान साकारण्यात येणार आहे. जुहू येथील कैफी आझमी उद्यान, कमला रहेजा पार्क आणि सातबंगला येथील नाना-नानी पार्क यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मतदारसंघातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वर्सोवा चौपाटी, जुहू तारा रोड येथील बीट पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. रॉयल हॉटेलजवळील जुहू तारा रोड आणि अंधेरी (प़) येथील खोजा जमात खाना येथे बीट पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. आंबोली येथील धाकूशेठ पाडा, खजूर वाडी, बुद्धनगर, नेहरूनगर, शिवाजीनगर येथे फाइव्ह स्टार शौचालाय बांधण्यासाठी ते सध्या प्रयत्नशील आहेत. जुहू मोरागांव येथे समाजमंदिर बांधून दिल्याची माहिती त्यांनी दिली.