ठाणे : आर्थिक वादातून ठाण्यातील व्यापाऱ्यास मुंबईच्या एका पोलीस शिपायाने कारने उडवण्याचा प्रयत्न केला. २१ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई रमेश आवटे आणि ठाण्यातील पाचपाखडी भागात आइसक्रीमचे दुकान चालविणारे अतुल पेठे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक वाद आहेत. पेठे यांच्याकडून त्यांनी ३ लाख रुपये घेतले होते. बरेच दिवस उलटूनही पैसे परत न मिळाल्याने पेठे यांनी पैशाची मागणी केली. मात्र, पैशाची मागणी केली की ते शिवीगाळ करायचे, असा आरोप पेठे यांनी केला आहे. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास पेठे हे त्यांच्या आइसक्रीमच्या दुकानामध्ये असताना आवटे तिथे आले. पेठे यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. आवटे बाजूच्याच एका मिठाईच्या दुकानात गेले. बाहेर आल्यानंतरही त्यांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. या प्रकाराचे त्यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू केले. आवटे त्यांच्या इनोव्हा कारपर्यंत जाईपर्यंत त्यांनी चित्रीकरण सुरू ठेवले. ते पाहून आवटे यांनी कार पेठे यांच्या अंगावर घातली. पेठे यांनी जीव वाचविण्यासाठी कारच्या बोनेटला पकडले. काही अंतरापर्यंत त्यांनी पेठे यांना फरफटत नेले. लोकांनी आरडा-ओरड सुरू केल्यानंतर पेठे यांनी बाजूला उडी मारून जीव वाचवला. एका दुकानाच्या सीसी कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 03, 2017 3:46 AM