रोहा : मुंबई - गोवा महामार्गावर भिरा फाटा नजीक येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीचा फिल्मीस्टाईल पाठलाग करून गाडी अडविण्याचा व मालकाने गाडीचे दरवाजे उघडावेत म्हणून दांडक्याचा वापर करून दर्डाविण्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. गाडीमालकाने सावधानता बाळगून दरवाजे न उघडल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी माणगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दोघा आरोपींना पकडले.शुक्रवारी सायंकाळी येथील बांधकाम व्यावसायिक अमित चिपळूणकर हे आपल्या टोयेटा फॉर्च्युनर गाडीतून माणगाव येथून रोह्याकडे येत होते. भिरा फाट्याच्या अलीकडे ट्रॅफिक झाल्याने ते गाडी उभी करून थांबले असता सदर ठिकाणी मारुती अर्टिगा गाडीतून आलेल्या ३ इसमांनी त्यांची गाडी तेथे उभी का केली, या कारणावरून हुज्जत धातली. चिपळूणकर यांनी पुढे ट्रॅफिक सुरू झाल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत कोलाईच्या दिशेने गाडी पुढे नेली असता या अनोळखी इसमांनी चिपळूणकर यांच्या गाडीचा पाठलाग करून कोलाडजवळ त्यांची गाडी अडवली. त्यांना दमदाटी करून गाडीबाहेर येण्यास सांगितले. अनोळखी इसम आणि त्यांच्या एकंदरीत वर्तवणुकीचा संशय आल्याने चिपळूणकर यांनी सावधानता बाळगून आपल्या गाडीचे दरवाजे उघडले नाहीत. ते गाडीचे दरवाजे उघडत नसल्याचे पाहून या इसमांनी दरवाजे खेचण्याचा तसेच गाडीच्या काचांवर जोरजोरात मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दी जमा झाल्याने तिघांनीही माणगावच्या दिशेने पळ काढला. याबाबत त्वरित माणगाव पोलिसांना कळवताच त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना रोहा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
व्यावसायिकाला लुबाडण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 27, 2015 10:55 PM