ब्राह्मण असल्यानेच मला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न! - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:58 AM2020-09-18T00:58:10+5:302020-09-18T06:33:06+5:30
वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझ्याबाबत असा संशय निर्माण करणाऱ्यांना कधीही यश येणार नाही, असे मत व्यक्त केले.
मुंबई : माझी जात ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षणाचा विषय माझ्यावर टाकला की संशय निर्माण करता येतो असे काही जणांना वाटते, अशी व्यथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तथापि, मी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले याची समाजाला पूर्ण कल्पना आहे, असे ते म्हणाले.
वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी माझ्याबाबत असा संशय निर्माण करणाऱ्यांना कधीही यश येणार नाही, असे मत व्यक्त केले. आरक्षणाच्या प्रकरणात महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडू नये, असे मी सांगितल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. स्वत: कुंभकोणी यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता तर महाविकास आघाडीचे सरकार आहे तरीही कुंभकोणी नव्हे तर माजी महाधिवक्ता थोरात यांच्या नेतृत्वातील टीम बाजू मांडत आहे, मी कुंभकोणी यांना तसे सांगण्याचा प्रश्न येतो कुठे? थोरात यांच्या टीमनेच
उच्च न्यायालयात केस जिंकलेली होती, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
मराठा समाजासाठी हे करा
आरक्षणाचा निर्णय होत नाही तोवर तातडीने काही उपाययोजना सरकारने कराव्यात, अशी मागणी फडणवीस यांनी केली. १) सारथी या संस्थेला मोठे आर्थिक बळ द्या. २) शासकीय शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवा म्हणजे मेरिटवर मराठा मुलामुलींना संधी मिळू शकेल. ३) मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती आहे, तोवर केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला द्या. ४) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळास भरघोस निधी देऊन मराठा तरुण-तरुणींना उद्योगांसाठी मदत करा.