Join us

‘बाजू हट, नहीं तो मार डालूंगा’ म्हणत पोलिस अधिकाऱ्यालाच उडवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 7:00 AM

नागपूरच्या व्यावसायिकपुत्राचा मरिन ड्राइव्हमध्ये मस्तवालपणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विनानंबर प्लेट सुसाट निघालेल्या तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. पोलिस थोडक्यात बचावताच तो वाटेत येणाऱ्या अन्य वाहनांनाही धडक देत सुसाट पुढे निघाला. नागरिकांनी त्याला अडविण्यासाठी गाडीच्या काचाही फोडल्या. अखेर, जवळपास अर्धा - पाऊण तासाच्या थरारक पाठलागानंतर भायखळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

आदित जितेश धवन (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे वडील नागपूरमध्ये व्यावसायिक आहेत. धवन हा शिक्षण घेत असून, तो अंधेरी परिसरात राहतो. रविवारी सायंकाळी धवन अंधेरीतून मरिन ड्राइव्हकडे येत असताना एका दुचाकीला धडक देत पुढे निघाला. यादरम्यान, सुंदर महल जंक्शन, एन. एस. रोड येथे सिग्नल लागला. तरी त्याची बाहेर निघण्याची धडपड सुरू होती.  

दुचाकीवर असलेल्या पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर बोडके (३५) यांना धवन हा पुढच्या बाजूने वाहन क्रमांक नसलेल्या कारने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताच त्यांनी त्याला थांबवले. तेव्हा “बाजू हट जाओ, नहीं तो जानसे मार डालूंगा,” अशी धमकी देत धवनने कार त्यांच्या अंगावर चढवली. बोडके यांना उपचारासाठी जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी हत्येचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

अन्य गाड्यांनाही धडकाबोडके वेळीच बाजूला झाल्यामुळे थोडक्यात बचावले. त्यापाठोपाठ वाटेत येणाऱ्या दुचाकीलाही त्याने धडक दिली. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी तोपर्यंत अन्य पोलिसांना अलर्ट दिला. काही जणांनी त्याला अडविण्यासाठी त्याच्या वाहनाच्या काचेवर मारले. यामध्ये त्याच्या वाहनाची काचही फुटली. या घटनेबाबत अलर्ट मिळताच भायखळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ट्रॅप लावून त्याला अडवले.

टॅग्स :गुन्हेगारी