गौरी टेंबकर, मुंबई: शौचालय भिंतीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा सारख्या अतीसंवेदनशील परिसरात घुसण्याचा प्रयत्न एका ४० वर्षीय व्यक्तीने केला. याविरोधात विलेपार्ले पोलिसांनी सीआयएसएफ अधिकाऱ्या (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळ ) च्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत सदर इसमाला ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार आशुतोष कुमार (४९) हे सीआयएसएफ युनिटमध्ये निरीक्षक पदावर असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याठिकाणी ते इन्स्पेक्टर पेरिमीटर सेक्टर म्हणून नोकरी करतात. त्यांनी विलेपार्ले पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मार्च रोजी दुपारी २.४० ते २.५० वाजण्याच्या सुमारास एअरपोर्ट वॉच टॉवर नंबर ६ वरून वॉकी टॉकी मार्फत त्यांना संपर्क करण्यात आला. तसेच एक इसम त्रिरत्न मित्र मंडळ जवळ असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या भिंतीच्या सहाय्याने एअरपोर्ट कंपाऊंडच्या भिंतीवर चढला असून तो आत उतरण्याचा प्रयत्न करत आहे असे कळविण्यात आले.
त्यावर आशुतोष यांनी त्यांच्या मोबाईलवरून या घटनेबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली आणि त्या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना त्याठिकाणी कोणीच आढळले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली गेली आणि विलेपार्ले पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई गजानन नाईक हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आसपासच्या परिसरात चौकशी केल्यावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव शंकर असल्याचे त्यांना समजले. अखेर त्यांनी सदर व्यक्तीला शोधून आणले आणि पोलीस ठाण्यात नेले. ताब्यात घेण्यात आलेल्या सदर व्यक्तीचे पूर्ण नाव शंकर शिंगे (४०) असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४४७, ५११ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न का करत होता? याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.