मालकाला गुंगीचे औषध देत मुंबईतील घर हडपण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:44 AM2022-09-19T05:44:53+5:302022-09-19T05:45:20+5:30
सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय मगी पड़ीक तापी यांचे त्याच परिसरात मालकीच्या ६ खोल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वयोवृद्ध घरमालकिणीच्या एकटेपणासह अज्ञानाचा फायदा घेत भाडेकरू दाम्पत्याने त्यांना जेवणातून गुंगीचे औषध देत कागदपत्रांवर ठसा घेत घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार सांताक्रुझमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी शेख दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय मगी पड़ीक तापी यांचे त्याच परिसरात मालकीच्या ६ खोल्या आहेत. १९९५ मध्ये पतीचे निधन झाले. मूल नसल्याने त्या एकट्याच राहण्यास आहे. खोल्या भाडेतत्त्वावर देत, त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. येथीलच एका खोलीत अस्लम शेख आणि त्याची पत्नी माधुरी शेख गेल्या ७ वर्षांपासून १ हजार रुपये भाडेतत्त्वावर राहण्यास आहे. त्यांच्यात भाडेकरारही करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांनी भाडे देणे बंद केले.
६ लाखांमध्ये खोली नावावर
फेब्रुवारीमध्ये तापी या आजारी पडल्याने शेख दाम्पत्याने त्यांना जेवणातून गुंगीचे औषध देत घराच्या कागदपत्रांवर अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतरही वारंवार पैशांबाबत चौकशी करताच त्यांच्याकडून टाळाटाळ सुरु होती. यादरम्यान शेख दाम्पत्याने कोऱ्या कागदावर ठसा घेतल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्याचे कागदपत्र तपासताच त्यामध्ये ६ लाखांमध्ये सदरची खोली शेख दाम्पत्याच्या नावावर केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे यात फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी चौकशीअंती शेख दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.