चांदिवलीला नशामुक्त करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरणार - आ. दिलीप लांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 09:21 AM2024-11-29T09:21:25+5:302024-11-29T09:22:03+5:30
आता २९० खाटांचे रुग्णालय उभे करत असून या रुग्णालयाबाहेर अतिशय सुंदर असे गार्डन आणि धबधबा तयार करणार आहे.
मुंबई - चांदिवली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत नागरी कामांवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. रस्ते, रुग्णालय, स्वच्छता आणि रोजगार हा माझा मुख्य अजेंडा आहे. मात्र, अजूनही अमली पदार्थांच्या अंमलाखाली तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे. काहीही झाले तरी आता चांदिवलीला नशामुक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिंदेसेनेचे आ. दिलीप लांडे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत व्यक्त केला. यावेळी ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
चांदिवली मतदारसंघाच्या विकासासाठी काय संकल्प आहे?
चांदिवली मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत काम करताना अनेक गोष्टी करता आल्याचे समाधान आहे. कुर्ला-अंधेरी या परिसरात औद्योगिक वसाहत आहे. वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी साकीनाका जंक्शन ते जरीमरी हा रस्ता केला. काजूपाडा विभागातील रस्ते केले. स्ट्रीट लाइट, जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांची कामे प्रामुख्याने केली. शौचालये उभारली. आता २९० खाटांचे रुग्णालय उभे करत असून या रुग्णालयाबाहेर अतिशय सुंदर असे गार्डन आणि धबधबा तयार करणार आहे. त्याचसोबत तेथील डोंगर खोदून त्यात गुहा तयार करण्याचा मानस असून बकाल वस्तीचे रूपांतर आकर्षक प्रेक्षणीय स्थळात होईल याची खात्री देतो.
झोपडपट्टी पुनर्विकासासाठी काय प्रयत्न करीत आहात?
मतदारसंघात अस्वच्छता, पाणी भरणे आणि झोपड्यांचा मोठा प्रश्न होता. या संदर्भात आता त्यांना पक्क्या घरामध्ये राहता यावे, म्हणून ८५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून घरांची डागडुजी करून दिली. डोंगरावर असलेल्या झोपड्या हटवून त्यांना पक्की घरे देत आहोत. तेथील जमीन वन खात्याच्या ताब्यात देऊन तेथे झाडे लावण्याचा मानस आहे. यामुळे विभागातील सर्व समाजांतील लोक आपल्या सोबत जोडले जात आहेत.
आपल्या मतदारसंघात अजूनही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन होते का?
अमली पदार्थांचे सेवन अलीकडे कमी झाले असले तरी पूर्णतः संपलेले नाही. तरुण पिढी बरबाद होऊ नये, यासाठी रस्त्यावर उतरून काम करणार आहोत. प्रदूषणकारी उद्योग आणि भट्ट्या बंद करून त्यांना अन्य उद्योगात सामावून घेत आहे. विभागात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, परिचारिका वसतिगृह, महाविद्यालय आणि ६५० खाटांचे कोहिनूर हॉस्पिटल अधिक सुसज्ज करून मूलभूत विकासापासून वंचित असलेल्या लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणारच.
रिक्षाचालक ते आमदार
रिक्षाचालक म्हणून काम सुरू केल्यानंतर शिवसेनेचा शाखाप्रमुख, नगरसेवक ते आमदार असा राजकीय प्रवास दिलीप लांडे यांनी केला आहे. त्यांच्या या प्रवासाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साक्षीदार आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांचे आजोळ आणि बरेचसे नातेवाईक लांडे यांच्या मतदारसंघात आहेत.