लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या विशेष बैठकीत बहुमताने, नरेश गडेकर यांची पुढील कार्यवाहीसाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड केली. मात्र नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह या नात्याने शरद पोंक्षे यांनी या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्या अनुषंगाने शरद पोंक्षे यांनी नरेश गडेकर यांना पत्र दिले आहे. त्यात नरेश गडेकर यांच्या अध्यक्षपदाला हरकत घेतल्याने, नरेश गडेकर व प्रसाद कांबळी यांच्यापैकी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नरेश गडेकर यांनी नाट्य परिषदेला ई-मेल पाठवला आणि त्यावर उत्तर म्हणून शरद पोंक्षे यांनी त्यांना पत्र दिले आहे. नियामक मंडळाच्या विशेष सभेच्या अनुषंगाने नरेश गडेकर हे संस्थेच्या कार्यालयात हजर राहून अवैधपणे अध्यक्ष म्हणून कारभार हातात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे निदर्शनास येत आहे, असे शरद पोंक्षे यांनी पत्रात नमूद केले आहे. २३ डिसेंबर २०२० व १३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस गडेकर अनुपस्थित राहिलात; सबब न्यासाच्या घटनेच्या तरतुदींप्रमाणे आपले कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व १४ जानेवारीपासून आपोआपच संपुष्टात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह हे न्यासाच्या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यामुळे अशा विश्वस्तांना काढण्याचा अधिकार फक्त धर्मादाय आयुक्तांना असल्याचे शरद पोंक्षे यांनी पत्रात म्हटले आहे.
* ...हा तर खाेडसाळपणा
नाट्य परिषदेचे प्रवक्ते या नात्याने मंगेश कदम यांनी हे पत्र प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून दिले आहे.
नियामक मंडळाच्या ज्या सदस्यांनी १८ फेब्रुवारी रोजी विशेष बैठक घेतली होती, तिचे नेतृत्व करणारे नियामक मंडळ सदस्य भाऊसाहेब भोईर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, वास्तविक हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि याबाबत मंगळवारी धर्मादाय आयुक्तांकडे आम्ही मंजूर केलेला ठराव दिला आहे, असे स्पष्ट केले. नरेश गडेकर यांच्या दोन सभांच्या अनुपस्थितीबद्दल बोलले जात असताना, इतर काही सदस्यसुद्धा अनेक बैठकींना हजर राहात नसल्याचा दावा त्यांनी केला. एकंदर हा खोडसाळपणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
..................
------------------------------------------------------------------------------------------------------------